Abhijeet Dipke : NDA मध्ये येण्याची ऑफर, पण महिन्याभरापूर्वी तर मी देशद्रोही होतो ना? अभिजीत दिपकेचा सवाल

Published : Aug 19, 2026, 12:54 PM ISTUpdated : Aug 19, 2026, 12:56 PM IST
Abhijeet Dipke

सार

Abhijeet Dipke Rejects NDA Offer : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची एनडीएचा भाग होण्याची ऑफर नाकारली आहे.

नवी दिल्ली : 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी एनडीए (NDA) मध्ये सामील होण्याची ऑफर धुडकावून लावली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिपके यांना त्यांच्या 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A)' मध्ये येण्याचं आमंत्रण दिलं होतं. आठवलेंचा पक्ष केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा घटकपक्ष आहे. पण या ऑफरवर अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर एकच सवाल विचारला - 'फक्त महिन्याभरापूर्वीपर्यंत मी तुमच्यासाठी देशद्रोही नव्हतो का?'

रामदास आठवले म्हणाले होते की, 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी अभिजीत दिपके यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये यावं.' 'अभिजीत एक तडफदार तरुण नेता आहे, त्याने आमच्यासोबत येऊन समाज आणि पक्षाला मजबूत करावं,' असं आवाहन आठवलेंनी केलं होतं. 'जे चूक करतात त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, हे केंद्रातील सरकारचं धोरण आहे,' असा दावाही त्यांनी केला. दिल्लीच्या जंतर-मंतरवर NEET परीक्षा पेपरफुटीवरून झालेल्या विद्यार्थी आंदोलनाचा आणि त्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याचा अप्रत्यक्ष उल्लेख करत आठवलेंनी हे विधान केलं होतं.

'देशद्रोही' शिक्क्यावर अभिजीत दिपके संतापले

याआधी, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना भाजप नेते आणि समर्थक 'देशद्रोही' ठरवत होते, यावर अभिजीत दिपके यांनी जोरदार टीका केली होती. 'Gen Z' पिढीला देशद्रोही म्हणू नका, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते. त्यावर, 'हाच संदेश तुम्ही भाजप नेत्यांना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही द्या,' अशी मागणी दिपके यांनी भागवतांकडे केली होती.

अभिजीत दिपके म्हणाले, 'धर्मेंद्र प्रधान यांनी Gen Z ला दहशतवाद्यांची 'बी-टीम' म्हटलं होतं आणि नितीन नबीन यांनी 'व्हायरस' संबोधलं होतं. भाजप सहसा RSS च्या विरोधात काही बोलत नाही किंवा भूमिका घेत नाही. त्यामुळे, आता तरी ते मोहन भागवतजींचं म्हणणं ऐकतील आणि त्याचा आदर करतील, अशी मला आशा आहे.' याच पार्श्वभूमीवर, 'मी तुमच्यासाठी देशद्रोही नव्हतो का?' असा सवाल करत दिपके यांनी NDA ची ऑफर नाकारली आहे.

आपल्याला निवडणुकीच्या राजकारणात कोणताही रस नाही, असं अभिजीत दिपके यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. 'कॉकरोच जनता पार्टी'ला (CJP) एक जनआंदोलन म्हणून पुढे घेऊन जायचं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. एका मुलाखतीत ते म्हणाले होते की, 'लोकांचा राजकारण आणि निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडाला आहे. तपास यंत्रणांचा वापर करून पक्ष फोडले जात आहेत, मतदारांची नावं यादीतून गायब केली जात आहेत. अशा परिस्थितीत फक्त राजकीय पक्ष स्थापन करून काहीही उपयोग नाही. देशाला सध्या एका मोठ्या जनआंदोलनाची गरज आहे.'

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

vivekanand patil | नवनाथ बन यांचा खरपूस समाचार | navnath ban | pune mpsc
MPSC Protest Pune | रात्री 2 उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडली, रु्ग्णालयात दाखल | MPSC Pune