
नवी दिल्ली- भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे काही दिवसांपूर्वी उत्तर आणि उत्तर-पश्चिम भारतातील ३२ विमानतळ नागरी विमान वाहतुकीसाठी तात्पुरते बंद करण्यात आले होते. मात्र आता ही सर्व विमानतळे पुन्हा उघडण्यात आली आहेत, अशी माहिती भारतीय नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने (AAI) दिली आहे. ही घोषणा भारत आणि पाकिस्तानदरम्यान झालेल्या शस्त्रसंधीनंतर करण्यात आली आहे.
"ऑपरेशन सिंदूर" या भारतीय कारवाईनंतर, जेव्हा भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले, त्यानंतर भारताने आपले हवाई क्षेत्र सुरक्षा कारणास्तव बंद केले होते. यामध्ये सुरुवातीला २४ विमानतळांचा समावेश होता, मात्र नंतर यामध्ये वाढ करत ३२ विमानतळांवर नागरी उड्डाणांवर बंदी घालण्यात आली होती.
सध्या नागरी उड्डाणासाठी परवानगी मिळालेल्या ३२ विमानतळांमध्ये श्रीनगर, चंदीगड, अमृतसर, जैसलमेर, जामनगर, जोधपूर, अधमपूर, अंबाला, अवंतिपूर, बठिंडा, भुज, बिकानेर, हलवारा, हिंडन, जम्मू, कांडला, काँगडा (गग्गल), केशोद, किशनगढ, कुल्लू-मनाली (भुंतर), लेह, लुधियाना, मुंद्रा, नलिया, पठाणकोट, पटियाळा, पोरबंदर, राजकोट (हिरासार), सरसावा, शिमला, थॉइस आणि उत्तरलाई यांचा समावेश आहे.
AAI कडून सूचित सूचना भारतीय विमानतळ प्राधिकरणाने याबाबत अधिकृत निवेदनात म्हटलं की –
"प्रवाशांना सूचित करण्यात येत आहे की १५ मे २०२५ रोजी सकाळी ५.२९ पर्यंत नागरी विमान उड्डाणासाठी बंद असलेली विमानतळे आता पुन्हा नागरी विमान वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहेत."
AAI ने प्रवाशांना विमान कंपन्यांच्या वेबसाइट्स तपासण्याचं आणि आपल्या उड्डाणाच्या स्थितीची खात्री करून घेण्याचं आवाहन केलं आहे.
२६ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी २६ नागरिकांची निर्घृण हत्या केली होती. यानंतर ३० एप्रिलला भारताने पाकिस्तानच्या विमानांना भारतीय हवाई क्षेत्रात प्रवेश नाकारला होता. त्यानंतर पाकिस्ताननेही आपलं हवाई क्षेत्र पूर्णतः बंद केलं. भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानकडून क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे सैनिकी ठिकाणे व नागरी भागांवर हल्ल्यांचा प्रयत्न झाला, परंतु भारतीय वायु संरक्षण प्रणालीने त्यांचा यशस्वी प्रतिकार केला.
"ऑपरेशन सिंदूर"दरम्यान भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये दहशतवाद्यांच्या तब्बल १०० तळांवर हल्ले केल्याचा दावा केला आहे. यावर भारताने वारंवार पत्रकार परिषदांद्वारे पुरावे सादर करत पाकिस्तानच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला.
भारत-पाक संघर्षामुळे बंद झालेली ३२ विमानतळे आता पुन्हा सुरु करण्यात आली असून, नागरी विमान वाहतूक पूर्ववत करण्यास परवानगी देण्यात आली आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे.