
Singer Rishabh Tandon Dies : फिल्म इंडस्ट्रीतून पुन्हा एकदा एक दुःखद बातमी समोर येत आहे. नुकतेच अभिनेते-कॉमेडियन असरानी यांचे निधन झाले होते. आता प्रसिद्ध गायक आणि अभिनेता ऋषभ टंडन यांचे निधन झाल्याची बातमी आहे. ऋषभच्या जवळच्या मित्राने त्याच्या निधनाची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की, ऋषभला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. त्याचे निधन दिल्लीत रात्री उशिरा झाले. त्याच्या निधनाच्या बातमीने चाहते थक्क झाले आहेत. सोशल मीडियावर त्याचे चाहते श्रद्धांजली वाहत आहेत. ऋषभ हे संगीत क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव होते. तो केवळ गायकच नाही तर संगीतकार आणि अभिनेताही होता.
ऋषभ टंडन संगीत क्षेत्रात 'फकीर' या नावाने प्रसिद्ध होता. त्याला गायनासोबतच अभिनय आणि संगीत दिग्दर्शनाचीही आवड होती. त्याचे 'इश्क फकीराना' हे गाणे खूप हिट झाले होते, ज्यामुळे त्याला 'फकीर' म्हणून ओळख मिळाली. निधनाच्या आठवडाभरापूर्वीच ऋषभने पत्नी ओलेस्यासोबत आपला वाढदिवस थाटामाटात साजरा केला होता. सोशल मीडियावर त्याची शेवटची पोस्ट त्याच्या वाढदिवसाचीच आहे. ही पोस्ट ऋषभच्या पत्नीने शेअर केली होती, जी ऋषभने आपल्या इंस्टाग्रामवर पुन्हा पोस्ट केली होती. यात ऋषभ पत्नीसोबत पोज देताना दिसत आहे. तो इंस्टाग्रामवर खूप सक्रिय होता. त्याचे जवळपास ४ लाख ४९ हजार फॉलोअर्स होते. चाहते आपल्या लाडक्या गायकाला आठवून सतत श्रद्धांजली वाहत आहेत.