
मुंबई : सोशल मीडिया पोस्टमुळे बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान वादात सापडली आहे. भोपाळचे अब्बास हाफीज यांनी करीना कपूर आणि तिची स्टायलिस्ट रिया कपूर यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. दिवाळीनिमित्त शेअर केलेल्या फोटोंमध्ये करीनाने घातलेल्या ऐतिहासिक पेंडंटवर हाफीज यांनी आक्षेप घेतला आहे. हे पेंडंट भोपाळ संस्थानाच्या बेगमांच्या वारशाशी संबंधित असून त्यावर कुराणची पवित्र आयत कोरलेली आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. धार्मिक भावना दुखावून हे पेंडंट फॅशन म्हणून वापरल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अब्बास हाफीज यांच्या म्हणण्यानुसार, करीना कपूरने दिवाळीला सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये तिने भोपाळ संस्थानाच्या बेगमांच्या ऐतिहासिक वारशाशी संबंधित पेंडंट घातले होते. या पेंडंटवर कुराणची आयत कोरलेली आहे. या धार्मिक महत्त्वामुळेच त्यांनी अभिनेत्री आणि तिची स्टायलिस्ट रिया कपूर यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.
मुस्लिम समाजात कुराणच्या आयतींना अत्यंत पवित्र मानले जाते, असे हाफीज यांनी म्हटले आहे. धार्मिक मान्यतेनुसार, अनेक लोक केवळ शुद्धतेच्या म्हणजेच वजूच्या अवस्थेतच कुराणच्या आयतींना स्पर्श करतात. धार्मिक श्रद्धेशी संबंधित हे पेंडंट फॅशन स्टेटमेंट म्हणून वापरण्यात आल्यावर त्यांनी आक्षेप घेतला असून हे अयोग्य असल्याचे म्हटले आहे. भोपाळच्या नवाबाचे बोधचिन्ह घालण्यावर आपला कोणताही आक्षेप नाही, मात्र पवित्र आयत असलेले पेंडंट अशा प्रकारे वापरणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
अब्बास हाफीज यांनी कायदेशीर नोटीसद्वारे करीना कपूरला तिच्या सर्व सोशल मीडिया अकाउंटवरून फोटो त्वरित काढून टाकावेत आणि सार्वजनिक माफी मागावी, अशी मागणी केली आहे. पवित्र धार्मिक चिन्हांचा असा वापर होऊ नये, असे ते म्हणाले. या प्रकरणावर करीना कपूर आणि रिया कपूर यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
अब्बास हाफीज यांचे वकील मोहम्मद जाफर यांनी म्हटले आहे की, या कृत्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. या आधारेच ही मागणीची नोटीस बजावण्यात आली आहे. फोटो हटवून सार्वजनिक माफी न मागितल्यास पोलीस किंवा सक्षम न्यायालयामार्फत कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा वकिलांनी दिला आहे. सध्या या नोटीसद्वारे उपस्थित केलेले आक्षेप आणि संभाव्य कायदेशीर कारवाईची चर्चा सुरू आहे.