
मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील हास्यसम्राट आणि सर्वांचे लाडके ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी अनेक विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. पण त्यांच्या कारकिर्दीतील एक गंभीर आणि धक्कादायक अनुभव त्यांनी नुकताच शेअर केला आहे. तोही बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानसोबतच्या एका सीनदरम्यान.
1992 साली आलेल्या 'जागृती' या चित्रपटात अशोक सराफ यांची भूमिका थोडी नकारात्मक होती, आणि त्यात एक असा सीन होता ज्यात सलमान खानने त्यांच्या गळ्यावर चाकू ठेवलेला होता. या दृश्याचं चित्रीकरण करताना जे घडलं, ते अक्षरशः थरकाप उडवणारं होतं.
रेडिओ नशाच्या एका पॉडकास्टमध्ये बोलताना अशोक सराफ यांनी सांगितलं, "त्या सीनमध्ये सलमान माझ्या गळ्यावर खराखुरा चाकू ठेवून उभा होता. चाकूचं टोक खूप धारदार होतं आणि अचानक माझ्या गळ्यावर खरंच थोडंसं कापलं गेलं. मी ताबडतोब त्याला म्हटलं. 'थोडं हळू दाब, खरंच लागलंय!'"
ते पुढे म्हणतात, "मी त्याला चाकू कसा पकडावा यावर सांगितलं, पण कॅमेराच्या अँगलमुळे तसं करता येत नव्हतं. शेवटी मी म्हटलं, ‘राहू दे, पूर्ण कर सीन.’ पण जेव्हा सीन पूर्ण झाला, तेव्हा पाहिलं तर गळ्यावर खोल जखम झाली होती. जर थोडीसी नस कापली गेली असती, तर… विचारही करवत नाही!"
या भीषण प्रसंगानंतरही अशोक सराफ यांनी सलमान खानसोबत काम करणं थांबवलं नाही. त्यांनी ‘करण अर्जुन’, ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘बंधन’ यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये पुन्हा सलमानसोबत स्क्रीन शेअर केली. ही गोष्ट फक्त सलमान खानचा अतिरेकी अॅक्शन अंदाज नाही, तर अशोक सराफ यांची प्रोफेशनल कमिटमेंट आणि धैर्य देखील अधोरेखित करते.