
मुंबई: बांद्रा पोलिसांना फोन करून बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या छत्तीसगढमधील रायपूर येथील फैजान खान नावाच्या वकिलास मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अधिक चौकशीसाठी त्याला मुंबईला आणण्यात आले आहे.
५ नोव्हेंबर रोजी बांद्रा पोलीस ठाण्यात आलेल्या धमकीच्या कॉलनंतर ही अटक करण्यात आली. त्याने आपल्या मोबाईल फोनवरून हा कॉल केला होता. याचा माग काढत पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचले. कॉल केल्याबाबत विचारणा केली असता, २ नोव्हेंबर रोजी आपला फोन चोरीला गेल्याचा दावा खानने केला, असे पोलिसांनी सांगितले. मात्र, शास्त्रीय चौकशीत त्याने गुन्हा कबूल केला.
त्याला शोधल्यानंतर तो छत्तीसगढ पोलिसांच्या निगराणीखाली होता. बांद्रा पोलिसांनी ७ नोव्हेंबर रोजी रायपूर येथे त्याची चौकशी केली. २ नोव्हेंबर रोजी आपला मोबाईल फोन चोरीला गेल्याचे खानने सांगितले आणि त्याबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केल्याचा दावाही त्याने केला.
फोन करणाऱ्याने शाहरुख खानकडे ५० लाख रुपये मागितले होते आणि मागणी मान्य न केल्यास अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती, असे बांद्रा पोलिसांच्या एफआयआरमध्ये म्हटले आहे. त्याचवेळी, तो व्यसनाधीन असताना हे कृत्य केले असावे, असे स्थानिक माध्यमांनी वृत्त दिले आहे.
सविस्तर चौकशीत धमकीचे कारण स्पष्ट होईल, असे मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे. धमकीचा कॉल करताना त्याने 'हिंदुस्थानी' असे नाव सांगितले होते, असे मुंबई पोलिसांच्या एफआयआरमध्ये म्हटले आहे.