रेल्वेने चौकशीअंती पोर्टरला कुटुंबाला ९,००० रुपये परत करण्याचे आदेश दिले आणि त्याचा परवाना रद्द केला.
रेल्वे स्थानकावर मोफत व्हीलचेअर सेवेसाठी प्रवाशांकडून पैसे आकारणाऱ्या पोर्टरचा परवाना रद्द करण्यात आला आहे. हजरत निजामुद्दीन स्थानकावर आलेल्या एका अनिवासी भारतीय कुटुंबाकडून त्याने मोफत व्हीलचेअर सेवेसाठी पैसे आकारले होते.
व्हीलचेअर मदत आणि सामान हाताळणीसाठी त्याने त्यांच्याकडून १०,००० रुपये अनधिकृतपणे घेतले. मात्र, रेल्वे स्थानकांवर ही सेवा मोफत असल्याचे समजल्यानंतर प्रवाशाच्या मुलीने, पायलने, तक्रार दाखल केली आणि रेल्वेने त्याच्यावर कारवाई केली.
चौकशीअंती रेल्वेने पोर्टरला कुटुंबाला ९,००० रुपये परत करण्याचे आदेश दिले आणि त्याचा परवाना रद्द केला. गुजरातचे हे कुटुंब २८ डिसेंबर रोजी आग्रा येथे जाण्यासाठी हजरत निजामुद्दीन स्थानकावर आले होते. तेथे त्यांनी व्हीलचेअर सेवा आणि सामान नेण्यासाठी एका पोर्टरची मदत घेतली. या संधीचा फायदा घेत त्याने कुटुंबाकडून १०,००० रुपये घेतले.
आग्रा येथे पोहोचल्यानंतर, एका टॅक्सीचालकाशी बोलताना त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. पोर्टर त्यांच्या सेवांसाठी फक्त थोडीशी रक्कमच आकारू शकतात हे समजल्यानंतर पायलने पोर्टरविरुद्ध रेल्वेत तक्रार दाखल केली.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना रेल्वेने असे म्हटले आहे की अशा प्रकारच्या पद्धती रेल्वे कधीही प्रोत्साहन देत नाही आणि कठोर कारवाई करेल. रेल्वेशी संबंधित कोणतीही तक्रार असल्यास १३९ या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधावा असेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.