पिंपरी चिंचवडच्या किवळे भागात 26 जुलैला रात्री मुलाने घराच्या इमारतीवरुन उडी घेत आपले जीवन संपवले. या घटनेनं परिसर हादरुन गेला आहे.
पुणे : पिंपरी चिंचवडमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दहावीत शिकणाऱ्या मुलाला ब्लु व्हेल गेमचे व्यसन जडले होते. या व्यसनाच्या आहारी तो इतका गेला की, याचा शेवट आत्महत्येने झाला. या 15 वर्षीय मुलाने थेट चौदाव्या मजल्यावरून उडी घेतल्याचे समोर आले आहे. ही धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडच्या किवळे भागात घडली आहे. माणसं सोशल मीडियाच्या अधीन झाली आहेत, तर लहान मुलं मोबाईलच्या (Mobile) नादी लागली आहेत, अशीच सध्याची परस्थिती आहे. त्यामुळे लहान मुलांचे मोबाईल वेड कसे कमी करावा हा पालकांसमोर यक्षप्रश्न आहे. कारण मुलांना लागलेले हे मोबाईलचे वेड कधी व्यसन बनते, त्यातूनच ते टोकाचे पाऊल उचलतात. यापूर्वी मोबाईल व्यसनाधिनता आणि मोबाईल गेमिंगच्या नादातून अशा घटना घडल्या आहेत.
सहा महिन्यांपासून मुलगा गेला होता गेमच्या आहारी
26 जुलै रोजी रात्री मुलाने घराच्या इमारतीवरुन उडी घेत आपलं जीवन संपवलं. या घटनेनं परिसर हादरुन गेला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा मुलगा गेमच्या आहारी गेला होता. त्यानंतर तो स्वतःला बेडरूममध्ये तीन-तीन तास कोंडून घेत असे. खोलीत एकटाच बडबड करत असायचा. घरात आजवर वडिलधाऱ्यांना घाबरणारा मुलगा थेट किचनमधील चाकुची मागणी करायला लागला होता. हा बदल पाहून आई-वडीलही चिंतेत होते. अतिवृष्टीमुळे 25 जुलैला शाळांना सुट्टी होती, तो ही दिवस त्याने गेम खेळण्यातच घालवला. मग रात्री अनेक विनवण्या केल्यानंतर तो जेवणासाठी बाहेर पडला. मात्र जेवण केल्यावर पुन्हा तो खोलीतच जाऊन बसला. आई-वडील दुसऱ्या मुलाला ताप आल्याने त्या चिंतेत होते. रात्रीचा एक वाजला तरी देखील मुलाचा ताप उतरेना, त्यामुळे आई जागीच होती. त्याचवेळी सोसायटीच्या व्हाट्सएपवर एक मुल जखमी अवस्थेत खाली पडल्याचा मेसेज आला. तो मेसेज मुलाच्या आईने वाचला अन तिला थोडी कुणकुण लागली. मग ती खोलीच्या दिशेने गेली, पण मुलगा घरात नव्हता, त्यानंतर धावाधाव करत ती जखमी अवस्थेत पडलेल्या मुलाजवळ पोहचली, बघते तर काय? तो तीचाच मुलगा होता.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पोटच्या लेकाला पाहून, आईची पायाखालची जमीनचं सरकली. मुलाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. घरात एका कागदावर गेममधील कोडिंगच्या भाषेत लिहिलेले काहीतरी आढळले. मात्र यातून त्याला काय नमूद करायचे होते, याचा शोध आता पिंपरी चिंचवड पोलीस लावत आहेत.
लहान मुलांमध्ये मोबाईल व गेमिंगचं व्यसन चिंताजनक
ब्लु व्हेल सारख्या असंख्य गेमच्या आहारी गेलेल्या मुलांसाठी आणि त्याकडे कानाडोळा करणाऱ्या पालकांसाठी ही अतिशय चिंतेची बाब आहे. या घटनेतून ते धडा घेतील आणि अशा धक्कादायक घटनेची पुनरावृत्ती होणार नाही. याची ते आत्ताच तातडीने खबरदारी घेतील, अशी अपेक्षा सुजाण व पोलिसांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान या पुण्यातील घटनेने लहान मुलांमधील मोबाईल व गेमिंगचं व्यसन ही चिंतेची बाब बनली असून पालक व शिक्षकांनीच यातून मार्ग काढला पाहिजे, असेही मत व्यक्त होत आहे.