
पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वामी चिंचोली परिसरात काही दिवसांपूर्वी वारकऱ्यांना लुटून एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. अमीर पठाण आणि विकास सातपुते अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
३० जून रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास काही वारकरी पुणे-सोलापूर महामार्गावरून पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी चारचाकी वाहनाने जात होते. दौंड तालुक्यातील चिंचोली परिसरात चहा पिण्यासाठी ते थांबले होते. चहा पिऊन परत गाडीत बसत असताना, दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी एका महिलेच्या तोंडावर मिरची पूड फेकली.
यानंतर आरोपींनी महिलेच्या अंगावरील दीड लाखांचे सोन्याचे दागिने ओरबाडून घेतले. एवढ्यावरच न थांबता, या नराधमांनी एका अल्पवयीन मुलीच्या गळ्याला कोयता लावून तिला फरफटत टपरी शेजारील नाल्याजवळील झाडीत नेले. तिथे दोघांनीही तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर ते घटनास्थळावरून फरार झाले.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पुणे ग्रामीण पोलीस गेल्या काही दिवसांपासून या आरोपींचा शोध घेत होते आणि अखेर त्यांना यश मिळाले. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना आज बारामती सेशन्स कोर्टात हजर करण्यात येणार आहे.