
पूर्णा : शहरातील कोळीवाडा परिसरात गुरुवारी रात्री उशिरा किरकोळ कारणावरून निर्माण झालेल्या वादाचे भीषण रूपांतरण होऊन एका २७ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण कोळीवाडा हादरून गेला असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेख सलमान शेख गुलाब (वय २७, रा. कोळीवाडा, पूर्णा) असे मृत युवकाचे नाव आहे. त्याच्या हत्या प्रकरणी गणेश जाधव, सुरज जाधव आणि शंकर पांढरे या तिघांविरोधात पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इम्रान गुलाब शेख यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली आहे.
घटनेचा तपशील असा आहे की, गुरुवारी (दि. १० जुलै) रात्री कोळीवाडा येथील खंडोबा मंदिराजवळ काही क्षुल्लक कारणावरून सलमान आणि वरील तिघांमध्ये वाद झाला. वाद विकोपास जाऊन तिघांनी सलमान याला प्रथम शिवीगाळ केली, नंतर लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली. यानंतर त्याचे डोके जवळील सवारी आलाव्याच्या कठड्याला जबरदस्त आदळून त्याला गंभीर जखमी केले. या मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील व पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पाटील पुढील तपास करत आहेत.
पूर्णा शहरातील कोळीवाडा परिसरात घडलेली ही हत्येची घटना हा सामाजिक अस्वस्थतेचा धक्कादायक नमुना ठरत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.