उत्तर प्रदेशातील बरेलीतील फतेहगंज पश्चिमी ब्लॉकच्या प्राथमिक विद्यालय माधोपूरमध्ये एक महिला ९ वर्षांपासून शिक्षिका म्हणून काम करत होती. तपासादरम्यान, तिने फर्जी निवास प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवल्याचे उघड झाले आहे. शुमैला खान असे या शिक्षिकेचे नाव असून तिचे पालक पाकिस्तानी नागरिक आहेत. रामपूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली आहे. विभागाने कारवाई करत तिला शिक्षिकेच्या पदावरून हटवले आहे.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत. जिल्हा बेसिक शिक्षणाधिकारी संजय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेची नियुक्ती २०१५ मध्ये झाली होती. तपासादरम्यान स्थानिक गुप्तचर युनिट (एलयू) ला असे आढळून आले की महिलेचे पालक पाकिस्तानी नागरिक आहेत. शुमैला हिने रामपूरमधून फर्जी कागदपत्रे बनवून शाळेत नोकरी मिळवल्याचा आरोप आहे.
श्री सिंह यांनी सांगितले की, या प्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली, त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी चौकशी करून निवास प्रमाणपत्र रद्द केले. तसेच आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशासन आता या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. शाळेचे मुख्याध्यापक म्हणाले की, ती एक चांगली शिक्षिका होती. तिला पाहून असे कधीच वाटले नाही की ती पाकिस्तानला समर्थन देते. तिची नोकरी गेल्याचे ऐकून वाईट वाटले, पण तिनेही तथ्य लपवू नयेत.