
मुंबई: आर्थिक राजधानी मुंबईतून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका १० वर्षांच्या चिमुकलीवर अमानवीय अत्याचार करण्यात आले असून, तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये चक्क स्क्रू ड्रायव्हर घालून तिचा व्हिडिओ बनवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने संपूर्ण मुंबई हादरली असून, बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पोलिसांनी २४ वर्षीय तरुण आणि त्याच्या २१ वर्षीय प्रेयसीला अटक केली आहे. पीडित चिमुकलीची आई केटरिंग कंपनीत काम करते आणि हे दोन्ही आरोपी तिच्या हाताखाली वेटर म्हणून काम करत होते. पीडित मुलगी आणि तिच्या आईसोबत ते एका चाळीत राहत होते. १५ मे ते १४ जून या कालावधीत, जेव्हा चिमुकलीची आई कामावर गेली होती, त्यावेळी या नराधमांनी अनेकदा तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
आरोपी तरुणाने चिमुकलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये स्क्रू ड्रायव्हर घालून तिला असह्य वेदना दिल्या. इतकेच नव्हे, तर त्याची प्रेयसी या अमानुष अत्याचाराचा व्हिडिओ बनवत होती. आरोपींनी चिमुकलीला मारहाणही केली आणि जर तिने आईला याबद्दल सांगितले, तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. या प्रकाराने चिमुकली प्रचंड घाबरली होती.
गुरुवारी, १९ जून रोजी अखेर त्या चिमुकलीने धीर करून आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितला. मुलीची आपबीती ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने तात्काळ मेघवाडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. मेघवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संभाजी जाधव यांनी सांगितले की, "आम्ही दोन्ही आरोपींना तात्काळ अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असून, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे."
आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ६४(१) (बलात्कार), ६४(२)(i) (संमती देण्यास असमर्थ महिलेवर बलात्कार), ७७ (चोरीने व्हिडिओ बनवणे), ११५ (जाणूनबुजून दुखापत करणे), ३५२ (अपशब्द वापरून अपमान करणे), ३५१(३) (मृत्यू किंवा गंभीर इजा पोहोचवण्याची धमकी देऊन गुन्हेगारी धमकी देणे) यांसह POCSO (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस) कायद्याच्या कलम ४, ६, ८ आणि १२ तसेच माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या कलम ६६E आणि ६७B अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. POCSO कायदा बालकांना लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण देण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
या घृणास्पद घटनेने पुन्हा एकदा समाजात बालकांच्या सुरक्षेबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. अशा नराधमांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे.