
Ludhiana Nurse Murder : कितीही पुरावे नष्ट करायेच प्रयत्न केले तरी, गुन्ह्याला वाचा फुटतेच. गुन्हेगार कितीही सराईत असला तरी, तो कोणता ना कोणता तरी पुरावा मागे सोडतोच. संपूर्ण पंजाबला हादरविणाऱ्या लुधियानाच्या नर्स रेखा प्रकरणाच्या बाबतीत असेच काहीसे घडले आहे. आता तिच्या जुन्या मोबाईलने या प्रकरणातील अनेक रहस्ये उघड केली आहेत. त्यामुळे पोलिसांना तपासासाठी दिशा मिळाली आहे. तिच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या कागदपत्रांनुसार आणि तक्रारींनुसार, रेखाचा बॉयफ्रेंड अमित निषादने तिच्या घरातच तिच्यावर अत्याचार केला आणि याबाबत कुठे वाच्यता केल्यास तिला आणि तिच्या मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.
मोबाईलमध्ये केवळ पोलीस आयुक्त आणि सायबर सेलला लिहिलेल्या तक्रारीच नाहीत, तर व्हिडीओ आणि कागदपत्रेही सापडली आहेत. या कागदपत्रांमध्ये रेखाने स्वतःच्या आणि मुलांच्या सुरक्षेची मागणी केली होती. मोबाईलमध्ये एक तडजोडपत्रही होते, ज्यात लिहिले होते की, दोन्ही पक्षांमध्ये परस्पर संमती झाली आहे आणि अमित निषादविरुद्धच्या तक्रारीवर कारवाई करू नये. पण या तडजोडपत्रावर रेखा, अमित किंवा कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याची सही नव्हती.
मोबाईलमधील कागदपत्रांनुसार, रेखाने 30 ऑक्टोबर 2024 रोजी कुटुंब आणि अमित निषादसोबत वैष्णोदेवीची यात्रा केली होती. 2 नोव्हेंबरला परतल्यानंतर अमितने तिच्या मुलांकडून मोबाईल घेतला आणि सर्व डेटा, फोटो आणि व्हिडीओ स्वतःच्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर केले. लुधियानाला पोहोचल्यावर अमितने तिच्यावर वारंवार अत्याचार केला आणि धमकी दिली.
मोबाईलमधील व्हिडीओ आणि तक्रारींवरून असे दिसून येते की, रेखाने दुसऱ्या दिवशी वैद्यकीय तपासणी करून पोलिसांत तक्रार दाखल केली, पण कोणतीही कारवाई झाली नाही. तिने पोलीस आयुक्तांना अमित निषादवर तात्काळ कारवाई करण्याची विनंती केली होती. पोलिसांनी वेळेवर कारवाई केली असती, तर ती जीवानिशी गेली नसती, असे कुटुंबाचे म्हणणे आहे.
मोबाईलमध्ये रेखाच्या सोशल मीडिया रील्स आणि सायबर सेलला दिलेल्या तक्रारीही सापडल्या. यामध्ये अमितने तिचे सोशल मीडिया आणि ॲप पासवर्ड हॅक करून तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता. अमित तिच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून फोटो आणि व्हिडीओ घेऊन तिला घाबरवण्याचा प्रयत्न करत होता, असे रेखाने मोबाईलमध्ये स्पष्ट केले होते.
रेखाचा भाऊ सरवनच्या मते, या प्रकरणाचा तपास पोलिसांनी नव्हे, तर सीबीआयने करायला हवा. मोबाईलमधील व्हिडीओ आणि कागदपत्रांवरून स्पष्ट होते की, प्रशासनाने अनेक महिने निष्काळजीपणा दाखवला. या प्रकरणात मोबाईल हाच सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरला आहे. त्याने जीवे मारण्याचा कट, धमक्या आणि पोलिसांचा निष्काळजीपणा उघड केला आहे. आता कुटुंब आणि कायदा पुराव्यांच्या आधारे न्यायाची अपेक्षा करत आहेत.