मीरतमधील एका बंद घरातून दाम्पत्य आणि त्यांच्या तीन मुलींचे मृतदेह आढळून आले आहेत. पोलिसांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे.
मीरत: उत्तर प्रदेशातील मीरतच्या लिसाडी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घरात दाम्पत्य आणि त्यांच्या तीन मुलींचे मृतदेह आढळून आल्याची घटना घडली आहे. दाम्पत्य आणि त्यांच्या तीन मुली घरात मृत अवस्थेत आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली. मृतांची ओळख वडील मोईन, त्यांची पत्नी अस्मा आणि त्यांच्या तीन मुली ८ वर्षांची अफसा, ४ वर्षांची अजीजा आणि १ वर्षांची आदिबा अशी झाली आहे. मृतांचे मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
दाम्पत्य मोईन आणि त्यांची पत्नी अस्मा यांचे मृतदेह जमिनीवर पडलेले असताना मुलींचे मृतदेह पलंगाखालील बेड बॉक्समध्ये भरलेले होते. मृत मोईन मेकॅनिक म्हणून काम करत होता आणि तो आणि त्याची पत्नी अस्मा बुधवारपासून बेपत्ता होते. तसेच, घराला बाहेरून कुलूप लावलेले होते. त्यामुळे या प्रकरणात अन्य कोणाचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घराचे कुलूप लावण्याच्या पद्धतीवरून, गुन्ह्यात सहभागी असलेली व्यक्ती कुटुंबाला परिचित असू शकते, असे मीरतचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (ASP) विपिन टाडा यांनी सांगितले.
पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा घराचा दरवाजा बंद असल्याचे आढळून आले. छतामार्गे पोलिसांनी घरात प्रवेश केला असता त्यांना मोईन, त्यांची पत्नी अस्मा आणि त्यांच्या तीन मुलींचे मृतदेह आढळून आले, अशी माहिती विपिन टाडा यांनी माध्यमांना दिली. प्राथमिक तपासात घटनेमागील हेतू जुना वैर असल्याचे समोर आले असून, याबाबत सविस्तर तपास सुरू असल्याचे एसएसपी म्हणाले. मृतांपैकी एकाच्या पायांना बेडशीटने बांधलेले असल्याचे आढळून आले आहे. फॉरेन्सिक टीम आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावरून पुरावे गोळा करत आहेत. हे कुटुंब नुकतेच या परिसरात राहायला आले होते आणि अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिस त्यांची पार्श्वभूमी तपासत आहेत, असे एसएसपी म्हणाले.