भोपाळ: साडी खरेदी करण्यासाठी आलेल्या पत्नीसमोर दुकानदाराने 'काका' असे संबोधल्याने पतीने त्याला मारहाण केली. ही घटना मध्य प्रदेशातील भोपाळ येथे घडली. भोपाळमधील जटकेडी येथे टेक्सटाईल व्यवसाय करणारे विशाल शास्त्री यांनी दुकानात आलेल्या एका व्यक्तीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. शनिवारी ही घटना घडली.
रोहित नावाच्या तरुणाने आणि त्याच्या मित्रांनी मिळून विशाल शास्त्री यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. रोहित हा त्याच्या पत्नीसोबत कपडे खरेदी करण्यासाठी आला होता. बराच वेळ दुकानातील साड्या पाहिल्यानंतरही त्यांना एकही साडी आवडली नाही. तेव्हा विशालने त्या तरुणाला किती किमतीची साडी घ्याल असे विचारले. त्यावर तरुणाने हजार रुपयांची साडी असे उत्तर दिले. आवडली तर त्यापेक्षा जास्त किमतीचीही साडी घेऊ शकतो असेही त्याने दुकानदाराला सांगितले. पैशाची कमतरता असल्याचे दुकानदाराला वाटत असेल तर ते चुकीचे आहे असेही त्याने स्पष्ट केले.
तरुणाचे उत्तर ऐकल्यानंतर दुकानदाराने 'काका, एक मिनिट थांबा, तुमच्या बजेटमधील साड्याही दाखवतो' असे म्हटले. तेव्हा तरुण संतापला. 'काका' म्हणू नका असे त्याने स्पष्ट केल्यानंतर दुकानदार आणि तरुण यांच्यात वाद झाला. त्यानंतर तरुण त्याच्या पत्नीला घेऊन दुकानातून निघून गेला आणि नंतर मित्रांसह परत आला.
दुकानात परत आल्यानंतर तरुणाने दुकानदाराला बाहेर ओढून काठी, बेल्ट इत्यादींनी मारहाण केली. दुकानातील कर्मचारी धावून आल्यानंतर तो आणि त्याचे मित्र पळून गेले. जखमी झालेल्या दुकानदाराने पोलिसात तक्रार दाखल केली आणि उपचार घेतले. सध्या तो उपचार घेत आहे.