थार खरेदी केल्याच्या आनंदात तरुणाने आपल्या हातातील मोठी बंदूक वापरून हवेत दोन गोळ्या झाडल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
नवीन वाहने खरेदी करणे हे प्रत्येकासाठी आनंदाची बाब असते. वाहन खरेदी केल्याचा छोटा आनंदोत्सव बहुतेक जण साजरा करतात. मात्र, मध्य प्रदेशातील एका व्यक्तीने काही दिवसांपूर्वी केलेला आनंदोत्सव थोडा अतिरेकी झाला असे म्हणावे लागेल. कारण नवीन महिंद्रा थार खरेदी केल्याचा आनंद त्याने मित्रांसह साजरा केला तो खऱ्या बंदूकीने हवेत गोळीबार करून. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर प्रचंड टीका झाली. १८ नोव्हेंबर रोजी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता.
महिंद्रा शोरूमच्या बाहेर चित्रित केलेल्या व्हायरल फुटेजमध्ये, एक व्यक्ती आपल्या नवीन, सजवलेल्या थारमध्ये हातात बंदूक घेऊन काही मित्रांसह उभा असल्याचे दिसत आहे. त्यानंतर तो हातातील बंदूक हवेत उंचावतो आणि सलग गोळीबार करतो. वाहनात असलेले इतर लोक त्याच्या कृत्याला प्रोत्साहन देतानाही व्हिडिओमध्ये दिसत आहेत.
सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात टीका झालेल्या या व्हिडिओला आतापर्यंत दहा लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. हा आनंदोत्सव नसून पूर्णपणे बेजबाबदारपणा असल्याचे बहुतेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी म्हटले आहे. अशा प्रकारच्या विवेकशून्य कृत्यांमुळे मोठे संकट निर्माण होऊ शकते असे काहींनी म्हटले आहे. अशा अस्वीकार्य कृत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी मागणी अनेकांनी केली आहे.