प्रेमविवाहासाठी मुलीला वडिलांकडून गोळ्या घालून हत्या

ग्वालियरमध्ये लग्नाच्या चार दिवस आधी वडिलांनी मुलीची गोळ्या घालून हत्या केली. मुलीने आईवडिलांनी पाहिलेल्या मुलाला नकार देऊन प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतल्याने वडिलांनी हे कृत्य केले.

ग्वालियर: तिच्या लग्नाला अवघे चार दिवस उरले होते, मात्र लग्नमंडपात आनखीनं बसायला हवी असलेल्या मुलीला वडिलांनीच मृत्युच्या दारात ढकलले. वडिलांनी पोलिसांसमोरच मुलीला गोळ्या घालून हत्या केली. मध्य प्रदेशातील ग्वालियरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. मुलीने आईवडिलांनी पाहिलेल्या मुलाला नकार देऊन आपल्या पसंतीच्या मुलाशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने संतप्त झालेल्या वडिलांनी आपल्या मुलीची हत्या केली. २० वर्षीय तनु गुर्जर ही वडिलांच्या हातून मृत्युमुखी पडलेली दुर्दैवी मुलगी. पोलिस अधिकाऱ्यांसमोरच ही हत्या घडली आहे. आईवडिलांनी ठरवलेल्या लग्नाला तनु गुर्जरने उघडपणे विरोध केला होता.

मंगळवारी संध्याकाळी ९ वाजण्याच्या सुमारास शहरातील गोला का मंदिर परिसरात ही हत्या घडली. त्याच दिवशी सकाळी मुलीने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमुळे संतप्त झालेले वडील महेश गुर्जर यांनी देशी बनावटीच्या बंदूकीने जवळून गोळी झाडली. यावेळी तनुचा नातेवाईक राहुल महेश गुर्जर यांच्या कृत्यात सहभागी झाला असून, त्याने अतिरिक्त गोळ्या झाडून तिचा मृत्यू निश्चित केला.

हत्येच्या काही तास आधी, तनु गुर्जरने तिच्या कुटुंबीयांनी तिच्या इच्छेविरुद्ध लग्न करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप करत एक व्हिडिओ रेकॉर्ड करून तो सोशल मीडियावर शेअर केला होता. ५२ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये, तिचे वडील महेश आणि इतर कुटुंबातील सदस्य तिच्या संकटाला कारणीभूत असल्याचे सांगून तिला जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. मी विकीशी लग्न करू इच्छित होते. माझ्या घरच्यांनी सुरुवातीला होकार दिला पण नंतर नकार दिला. ते रोज मला मारतात आणि जीवे मारण्याची धमकी देतात. मला काही झाले तर माझे कुटुंब जबाबदार असेल, असे तनुने व्हिडिओत म्हटले आहे.

व्हिडिओमध्ये तिने ज्या विकीचा उल्लेख केला आहे तो उत्तर प्रदेशातील आग्रा येथील रहिवासी असून, सहा वर्षांपासून तनुशी त्याचे संबंध होते. तनु गुर्जरचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, वरिष्ठ पोलिस अधीक्षक धर्मवीर सिंग यांच्या नेतृत्वाखालील पोलिस अधिकारी तनुच्या पालकांशी आणि तिच्याशी मध्यस्थी करण्यासाठी तिच्या घरी पोहोचले. समाजाची पंचायतही सुरू होती आणि ते प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करत होते.

या मध्यस्थीदरम्यान तनुने घरी राहण्यास नकार दिला. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने हिंसाचारग्रस्त महिलांना मदत करण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या वन-स्टॉप सेंटरमध्ये नेण्याची विनंती केली. तिचे वडील तिच्याशी खाजगीत बोलण्यासाठी पुढे आले आणि तिला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जे घडले ते कोणीही अपेक्षित नव्हते. महेशने आपल्याकडील देशी बनावटीच्या बंदूकीने मुलीच्या छातीवर गोळी झाडली. त्याचवेळी राहुलने झाडलेल्या गोळ्या तनुच्या कपाळावर, मानेवर आणि तिच्या डोळ्या आणि नाकाच्या मधल्या भागात लागल्या. यामुळे तनु जागेवरच कोसळली आणि तिचा मृत्यू झाला.

त्यानंतर वडील आणि नातेवाईक राहुलने बंदूक पोलिस आणि कुटुंबातील सदस्यांकडे वळवली आणि पुढील हिंसाचाराची धमकी दिली. यावेळी पोलिसांनी महेशला ताब्यात घेतले आणि अटक केली. मात्र राहुल पिस्तूलसह पळून जाण्यात यशस्वी झाला. १८ जानेवारी रोजी तनुचे लग्न ठरले होते आणि लग्नाची जोरदार तयारी सुरू होती.

Share this article