त्या मुलीचा सापाच्या दंशाने मृत्यू झाला असे सांगून पालकांनी तिला दफन केले होते. मात्र दोन महिन्यांनंतर मुलीच्या आईला विष देऊन खून करण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा एक धक्कादायक सत्य समोर आले.
विजयपूर : त्या मुलीचा सापाच्या दंशाने मृत्यू झाला असे सांगून पालकांनी तिला दफन केले होते. मात्र दोन महिन्यांनंतर मुलीच्या आईला विष देऊन खून करण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा एक धक्कादायक सत्य समोर आले. हे सत्य समजल्यावर संपूर्ण कुटुंब हादरले. ६ महिन्यांपूर्वी दफन केलेला मुलीचा मृतदेह पुन्हा बाहेर काढून त्याचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.
६ महिन्यांपूर्वी पुरलेला मृतदेह बाहेर: जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील बरडोळ गावी गेल्या मे १२ रोजी साप्रिन वंटी नावाच्या १० वर्षांच्या मुलीचा सापाच्या दंशाने मृत्यू झाला असे सांगून तिचा अंत्यसंस्कार करण्यात आला होता. कुटुंबीयांनी त्यांच्याच शेतात मृतदेह पुरून अंत्यविधी केला होता. मात्र आता ६ महिन्यांनंतर मुलीचा मृतदेह पुन्हा बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात आले आहे. विजयपूरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक शंकर मरिहाळ, इंडी उपविभागीय अधिकारी हबीब गद्याळ यांच्या नेतृत्वाखाली मुलीचे शवविच्छेदन करण्यात आले.
आता का शवविच्छेदन?: ६ महिन्यांपूर्वी सापाच्या दंशाने मृत्यू झालेल्या मुलीचे शवविच्छेदन आता का करण्यात येत आहे, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. याचे कारण म्हणजे मुलीच्या मृत्यूबाबत निर्माण झालेले संशय. मुलीचा मृत्यू सापाच्या दंशाने झाला नसून हा नियोजित खून असल्याचा आरोप मुलीचे वडील सलीम वंटी आणि आई शबाना यांनी केला आहे. ६ महिन्यांपूर्वी आपल्या मुलीला करंट देऊन नातेवाईकांनी खून केल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे.
मुलीनंतर, आईचाही खून करण्याचा प्रयत्न?: मे १२ रोजी साप्रिनचा मृत्यू झाला होता. मात्र सापाने दंश केला असे समजून कुटुंबीयांनी तिला दफन केले. मात्र २ महिन्यांनंतर म्हणजेच जुलै ७ रोजी मुलीच्या आई शबाना हिला नातेवाईकांनी जबरदस्तीने विष पाजण्याचा प्रयत्न केला. यावेळी विष पाजणारा नातेवाईक महंमद वंटी आणि त्याची आई रजाकमा म्हणाले की, "आम्ही तुझ्या मुलीला करंट देऊन मारले आहे. तेव्हा तुला मारायचे होते, पण जमले नाही. आता वेळ आली आहे." असे म्हणत त्यांनी बाटलीतील विष पाजले. त्यानंतर दार लावून ते निघून गेले. सुदैवाने शबानाचा जीव वाचला. तिने घडलेली घटना सांगितली. यावेळी मुलीचा मृत्यू सापाच्या दंशाने नव्हे तर करंट देऊन झाल्याचे शबानाने सांगितले. शबाना विष प्राशन झाल्यावर बोलत असतानाचा व्हिडिओ तिचे पती सलीमने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता.
मुलीच्या शवविच्छेदनाचे डीजींचे आदेश: मुलगी साप्रिनचा मृत्यू संशयास्पद असल्याबाबत नातेवाईकांविरुद्ध तक्रार देण्यासाठी वडील सलीम आणि आई शबाना चडचण पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र पोलिसांनी तक्रार घेतली नाही, योग्य तपास केला नाही, असा आरोप सलीमने केला आहे. त्यानंतर मुलीच्या मृत्यूबाबत असलेल्या संशयाबाबत आणि पत्नीच्या हत्येच्या प्रयत्नाबाबत त्यांनी बेंगळुरू येथील पोलीस महासंचालकांना तक्रार दिली. प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलीस महासंचालकांनी साप्रिनच्या शवविच्छेदनाचे आदेश दिले. या आदेशानुसार काल शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर खरे सत्य समोर येईल.