
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने आपल्या प्रभावी कामगिरीने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने भुवनेश्वर कुमारला मागे टाकत इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत २० किंवा त्याहून अधिक विकेट घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज होण्याचा मान मिळवला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी ओव्हलच्या मैदानावर सिराजने हा विक्रम साध्य केला. दिवस ४ मध्ये त्याचा माऱ्याचा स्पेल अत्यंत परिणामकारक ठरला. त्याने आठ षटके टाकत केवळ ३३ धावा दिल्या आणि ओली पोपची मोलाची विकेट मिळवली. पहिल्या सत्राच्या अखेरीस त्याचे आकडे १२ षटकांत २/४४ असे होते.
सिराज सध्या चालू असलेल्या या मालिकेत ९ डावांमध्ये ३४.३० च्या सरासरीने २० विकेट्स घेत आघाडीवर आहे. त्याची सर्वोत्तम कामगिरी ६/७० अशी आहे. त्याने २०१४ च्या मालिकेत भुवनेश्वर कुमारने घेतलेल्या १९ विकेट्सचा (सरासरी २६.६३, सर्वोत्तम ६/८२) विक्रम मोडीत काढला आहे.
इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत भारतीय गोलंदाजांनी घेतलेल्या सर्वाधिक विकेट्सचा विक्रम जसप्रीत बुमराहच्या नावावर आहे. बुमराहने पाच सामन्यांत २२.४७ च्या सरासरीने २३ विकेट्स घेतल्या होत्या. त्याची सर्वोत्तम कामगिरी होती ५/६४, जी या मालिकेतील त्याची एकमेव पाच विकेट्सची कामगिरी होती.
सामन्याच्या स्थितीबाबत बोलायचे झाल्यास, इंग्लंडने चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्राचा शेवट १६४/३ वर केला. इंग्लंडला सामना जिंकण्यासाठी अजून २१० धावांची गरज आहे. सध्या हॅरी ब्रूक (३८*) आणि जो रूट (२३*) नाबाद आहेत.
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारताचा डाव १५३/६ वर अडखळला होता. मात्र करुण नायर (१०९ चेंडूत ५७, ८ चौकार) आणि वॉशिंग्टन सुंदर (५५ चेंडूत २६, ३ चौकार) यांच्यातील ५८ धावांची भागीदारीमुळे भारताचा डाव २२४ धावांवर पोहोचला. इंग्लंडकडून गस अॅटकिन्सनने पाच विकेट्स घेतल्या, तर जोश टंगने ३/५७ अशी कामगिरी केली.
इंग्लंडच्या पहिल्या डावात झॅक क्रॉली (५७ चेंडूत ६४, १४ चौकार) आणि बेन डकेट (३८ चेंडूत ४३, ५ चौकार, २ षटकार) यांनी ९२ धावांची दणदणीत सलामी दिली. पण मोहम्मद सिराज (४/८३) आणि प्रसिद्ध कृष्णा (४/६२) यांच्या झंझावातामुळे इंग्लंडचा डाव २४७ धावांवर आटोपला. त्यामुळे इंग्लंडला फक्त २३ धावांची आघाडी मिळाली.
भारताच्या दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वाल (१६४ चेंडूत ११८, १४ चौकार, २ षटकार), आकाश दीप (९४ चेंडूत ६६, १२ चौकार), रवींद्र जडेजा (७७ चेंडूत ५३, ५ चौकार) आणि वॉशिंग्टन सुंदर (४६ चेंडूत ५३, ४ चौकार, ४ षटकार) यांच्या दमदार फलंदाजीमुळे भारताने ३९६ धावांचा डाव उभा केला. त्यामुळे भारताला ३७३ धावांची आघाडी मिळाली आणि इंग्लंडला विजयासाठी ३७४ धावांचे लक्ष्य मिळाले.