बीडमध्ये पतीने उशिने तोंड दाबून पत्नीचा केला खून, स्वत: गळफास घेऊन केली आत्महत्या

सार

शहरातील वृंदावन कॉलनीत आज पहाटेच्या सुमारास पतीने उशिने तोंड दाबून पत्नीचा खून करून स्वत: देखील दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

बीड : शहरातील वृंदावन कॉलनीत आज पहाटेच्या सुमारास पतीने उशिने तोंड दाबून पत्नीचा खून करून स्वत: देखील दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, मन सुन्न करणाऱ्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

भागवत वायभट व राधा वायभट (वय 26) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. भागवत हा रिक्षाचालक असून बीड शहरात किरायाचे घर करुन कुटूंबासह रहात होता. शनिवारी रात्री पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यावेळी त्याने पत्नीला मारहाणही केली. त्यानंतर मध्यरात्रीच डोक्याखाली घेण्याच्या उशिने पत्नीचे तोंड दाबले. त्यामध्ये गुदमरुन राधाचा मृत्यू झाला. पत्नीचा खून केल्यानंतर स्वत: देखील दरवाजाबाहेर असलेल्या हुकाला दोरी अडकवून भागवतने गळफास घेतला. सकाळी झोपेतून उठवल्यावर त्यांच्या पाच वर्षाच्या चिमुकलीने हा प्रकार पाहिला. चिमुकलीच्या रडण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी सर्व प्रकार पाहिल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनेची माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करुन दोन्ही मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेले होते. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

किरकोळ वादातून पती-पत्नीने हे टोकाचे पाऊल उचलल्याने अंगावर शहारे आणणारी घटना घडली. मात्र या घटनेत कुठलाही दोष नसलेल्या चिमुकलीच्या डोक्यावरचे मायेचे छत्र हरवले, 5 वर्षाची चिमुकली पोरकी झाली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Share this article