नवऱ्याला पत्नीपेक्षा मांजरीची जास्त काळजी, पत्नीची कोर्टात तक्रार

हुंडा किंवा क्रूरता नव्हे तर मांजरीवरून झालेला वाद हा या वादाचे कारण असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. 

कर्नाटक उच्च न्यायालयात काही दिवसांपूर्वी एक असामान्य केस आली. बेंगळुरू येथील एका महिलेने आपल्या पतीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. पती आपल्यापेक्षा घरातील मांजरीला जास्त महत्त्व देतो, अशी तिची तक्रार होती. कोर्टाने या प्रकरणात मध्यस्थी करून पुढील कारवाई थांबवली आहे. 

घरातील सामान्य वाद कोर्टापर्यंत पोहोचला आहे. पतीला आपल्यापेक्षा घरातील मांजरीची जास्त काळजी असते आणि यावरून नेहमीच घरात वाद होतात, असा पत्नीचा आरोप होता. त्या मांजरीने आपल्याला ओरखडेही मारले आहेत, असाही आरोप तिने केला. 

डेक्कन हेराल्डच्या वृत्तानुसार, क्रूरता आणि हुंडा मागणी यासंदर्भात आयपीसी कलम ४९८ अ अंतर्गत ही कारवाई सुरू झाली होती. मात्र, हुंडा किंवा क्रूरता नव्हे तर मांजरीवरून झालेला वाद हा या वादाचे कारण असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. 

न्यायमूर्ती एम. नागप्रसन्न यांनी सांगितले की, पती मांजरीकडे जास्त लक्ष देतो यावरून पत्नीने तक्रार केली होती आणि त्यामुळे वाद झाला. मांजरीने अनेक वेळा पत्नीला ओरखडे मारले आहेत. यामुळे समस्या आणखी वाढल्या. 

महिलांची तक्रार आयपीसी कलमाच्या अंतर्गत येत नाही, असेही न्यायमूर्ती एम. नागप्रसन्न यांनी म्हटले. असे छोटे वाद मोठे होऊन कोर्टात येणे हे न्यायव्यवस्थेसाठी त्रासदायक आहे, असेही कोर्टाने म्हटले आहे. 

(चित्र प्रतिकात्मक)

Share this article