अक्षय शिंदेला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी, SIT प्रमुख आरती सिंह बदलापुरात दाखल

Published : Aug 21, 2024, 12:24 PM ISTUpdated : Aug 21, 2024, 12:25 PM IST
akshay shinde send to police custody

सार

एसआयटी पथकाच्या प्रमुख आरती सिंह बुधवारपासून तपासाला सुरुवात करणार आहेत. आरोपी अक्षय शिंदे याला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. कसून चौकशी केली जाणार आहे. 

कल्याण: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला न्यायालयाने 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. अक्षय शिंदे यांनी बदलापूरच्या एका नामांकित शाळेतील दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केले होते. यानंतर बदलापूरमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्याची परिणती उग्र आंदोलनात झाली होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी आरोपी अक्षय शिंदे याला कल्याण कोर्टात हजर करण्यात आले. अक्षय शिंदे याच्याविरोधात सध्या प्रचंड जनक्षोभ आहे. त्यामुळे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्याला थेट कोर्टात न आणता व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर केले जाईल, अशी चर्चा होती. मात्र न्यायालय परिसरात प्रचंड मोठा फौजफाटा तैनात करुन अक्षय शिंदे याला बुधवारी कोर्टासमोर हजर करण्यात आले. बुधवारी त्याला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर सरकारी वकिलांनी हे प्रकरण गंभीर असून, याप्रकरणाची अधिक चौकशी करण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यानुसार न्यायालयाने अक्षय शिंदे याची रवानगी 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत केली आहे.

विशेष तपास पथकाच्या (SIT) प्रमुख आरती सिंह बुधवारी बदलापूरमध्ये दाखल

तर दुसऱ्या बाजूला याप्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने नेमलेल्या विशेष तपास पथकाच्या (SIT) प्रमुख आरती सिंह बुधवारी बदलापूरमध्ये दाखल झाल्या. बदलापूरमधील ज्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला तिथे जाऊन आरती सिंग या तपासाची सूत्रे हाती घेणार आहेत. यानिमित्ताने ठाण्यातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी बदलापूरमध्ये दाखल झाले आहेत. यामध्ये पोलीस आयुक्त, सहआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. डीआयजी आरती सिंग या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहेत. एसआयटी पथकात कोणत्या अधिकाऱ्यांचा समावेश होणार, कोण तांत्रिक पुरावे गोळा करणार, कोण घटनास्थळी जाऊन पुरावे गोळा करणार, तपासाची दिशा नेमकी कशी असेल, याबाबतचे निर्णय या बैठकीत होतील. त्यानंतर आरती सिंह अधिकृतरित्या बदलापूर पोलिसांकडून तपासाची सूत्रे स्वीकारतील. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

बदलापूरमध्ये तणाव कायम

बदलापूर पूर्वेला असणाऱ्या शाळेतील चार वर्षांच्या दोन मुलींवर अक्षय शिंदे याने शाळेच्या स्वच्छतागृहात नेऊन अत्याचार केले होते. पोलिसांकडून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात चालढकल झाल्याने बदलापूर शहर आणि रेल्वे स्थानकात मंगळवारी उग्र आंदोलन झाले होते. बुधवारी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी बदलापूरमध्ये तणाव कायम आहे. शहरातील मोजकी दुकाने उघडली आहेत. तर शाळा या बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी बदलापूर शहरातील इंटरनेट सेवाही खंडित करण्यात आली आहे. याशिवाय पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आंदोलकांची धरपकड सुरु केली आहे.

आणखी वाचा : 

बदलापूर प्रकरणावरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले...

 

 

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

गुजरात हादरलं! साडीवरून झालेल्या वादातून लग्नाच्या दिवशीच होणाऱ्या पतीने केला वधूचा खून
Sangali Crime : सांगली हादरली! राजकीय पदाधिकाऱ्याचा वाढदिवसाच्या कार्यक्रमात खून