पाकिस्तानच्या सिंध प्रांतात १० वर्षांच्या हिंदू मुलीचे अपहरण करून ५० वर्षीय व्यक्तीशी जबरदस्तीने निकाह लावण्याचा प्रयत्न झाला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून ही घटना रोखली.
इस्लामाबाद. पाकिस्तानात हिंदू मुलींचे अपहरण आणि जबरदस्तीने धर्मांतर करण्याचे प्रकार थांबायचे नाव घेत नाहीत. नुकतेच सिंध प्रांतातील एका ग्रामीण भागात १० वर्षांच्या हिंदू मुलीचे अपहरण करून तिचा विवाह ५० वर्षीय व्यक्तीशी जबरदस्तीने लावण्यात आला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून मुलीला तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.
रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानात हिंदू मुलींचे अपहरण आणि धर्मांतर करण्याचे प्रकार सतत घडत आहेत. पाकिस्तान दरावर इत्तेहाद (अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी काम करणारी NGO) चे अध्यक्ष शिवा काछी यांच्या मते, दुसऱ्या एका घटनेत दक्षिण सिंधमधील संघर येथे १५ वर्षीय हिंदू मुलीचे अपहरण करून तिचा विवाह एका मध्यमवयीन मुस्लिम व्यक्तीशी लावण्यात आला. अद्याप या मुलीचा ठावठिकाणा लागलेला नाही.
शिवा काछी यांच्या मते, पाकिस्तानच्या मीरपूर खास येथील कोट गुलाम मुहम्मद गावातून १० वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर तिला सरहंदी येथील एका मदरशात नेण्यात आले. तेथे तिचा निकाह शाहिद नावाच्या एका मुस्लिम व्यक्तीशी जबरदस्तीने लावण्यात आला. मुलीच्या कुटुंबीयांनी स्थानिक अधिकारी आणि SSP पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर मुलीला सोडवून तिच्या घरी पाठवण्यात आले. याशिवाय आणखी एक मुलगी गेल्या रविवारपासून बेपत्ता आहे. तिच्या अपहरणकर्त्यांनी बनावट जन्म प्रमाणपत्र, विवाह प्रमाणपत्र आणि धर्मांतराचे प्रमाणपत्र बनवले आहे, जेणेकरून न्यायालयात मुलगी प्रौढ असल्याचे आणि तिने स्वतःच्या मर्जीने निकाह केल्याचे सिद्ध करता येईल.
दरावर इत्तेहादचे अध्यक्ष शिवा यांच्या मते, पाकिस्तानातील भ्रष्ट यंत्रणा धर्मांतराच्या कामात सामील आहे. काही पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मदतीने बनावट कागदपत्रे तयार केली जातात. जेव्हा पीडितेचे पालक किंवा वकील न्यायालयात जातात तेव्हा ही बनावट कागदपत्रे सादर केली जातात.