
Gopichand Hinduja Death: हिंदूजा समूहाचे (Hinduja Group) अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदूजा यांचे लंडनमध्ये वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले आहे. कुटुंबाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही आठवड्यांपासून ते आजारी होते आणि लंडनमधील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
व्यवसाय जगतात 'जीपी' (GP) या नावाने ते ओळखले जात. मे २०२३ मध्ये त्यांचे मोठे बंधू श्रीचंद हिंदूजा यांच्या निधनानंतर, हिंदूजा कुटुंबाच्या दुसऱ्या पिढीतील गोपीचंद यांनी समूहाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी सुनीता, पुत्र संजय आणि धीरज आणि कन्या रीता असा परिवार आहे.
ब्रिटिश-भारतीय उद्योगपती गोपीचंद हिंदूजा यांच्या निधनामुळे एका युगाचा अंत झाल्याची भावना त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. लॉर्ड रामी रेंजर, जे त्यांचे जवळचे सहकारी होते, त्यांनी शोक व्यक्त करताना म्हटले, “माझ्या प्रिय मित्र जीपी हिंदूजा यांच्या निघाण्याची दुःखद बातमी मी आपल्यासोबत शेअर करत आहे. ते अत्यंत सभ्य, नम्र आणि निष्ठावान मित्र होते. ते खऱ्या अर्थाने समाजाचे हितचिंतक आणि एक मार्गदर्शक शक्ती होते.”
गोपीचंद पी. हिंदूजा हे सातत्याने वार्षिक 'संडे टाइम्स रिच लिस्ट'मध्ये स्थान मिळवत असत. यावर्षी देखील हिंदूजा समूहाने सलग चौथ्या वर्षी या यादीत सर्वात वरचे स्थान मिळवले होते, त्यांची अंदाजित संपत्ती ३५.३ अब्ज पौंड होती.
गोपीचंद हिंदूजा यांनी ऑटोमोटिव्ह, तेल आणि विशेष रसायने, बँकिंग आणि वित्त, आयटी, आरोग्यसेवा आणि रिअल इस्टेट अशा विविध क्षेत्रांमध्ये पसरलेल्या या बहुराष्ट्रीय समूहाचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली समूहाने नुकतेच मध्य लंडनमधील ओल्ड वॉर ऑफिस (OWO) लक्झरी हॉटेल संकुलाचा त्यांच्या व्यवसायात समावेश केला.
गोपीचंद पी. हिंदूजा हे भारत आणि ब्रिटनचे आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याचे मुखर पुरस्कर्ते म्हणून ओळखले जात.
लंडनमध्ये होणाऱ्या व्यावसायिक मेळाव्यांमध्ये ते अनेकदा उद्योजकांना भारताच्या वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठेत गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित करत असत.
"आम्ही नेहमीच भारत आणि यूकेमध्ये सर्वोत्तम काय करता येईल यासाठी काम करत आहोत, कारण आमची जबाबदारी ही यजमान देश (ब्रिटन) आणि मातृभूमी (भारत) यांच्यात पूल म्हणून काम करण्याची आहे, असे त्यांनी नुकतेच एका व्यावसायिक कार्यक्रमात म्हटले होते.
त्यांना त्यांच्या व्यवसाय आणि उद्योगातील योगदानासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. अगदी अलीकडे, ऑगस्ट महिन्यात लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शनमध्ये त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
त्यांचे मोठे बंधू आणि समूहाचे सह-अध्यक्ष एस.पी. हिंदूजा यांचे मे २०२३ मध्ये निधन झाले होते. प्रकाश आणि अशोक यांच्यासह हिंदूजा बंधू, ब्रिटनमधील सर्वात सुप्रसिद्ध भारतीय वंशाच्या व्यावसायिक कुटुंबांपैकी एक होते. त्यांचा समूह ४८ देशांमध्ये कार्यरत आहे.