
वॉशिंग्टन : अमेरिकेतील फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (FDA) ने एक गंभीर इशारा जारी करत भारतीय कंपनीच्या कुकवेअरपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. सरस्वती स्ट्रिप्स प्रायव्हेट लिमिटेड या भारतीय कंपनीने बनवलेली भांडी आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे FDA ने स्पष्ट केले आहे. या भांड्यांमध्ये अन्न शिजवताना किंवा साठवताना शिसं (Lead) अन्नात मिसळण्याची शक्यता आढळली आहे. शिसं ही एक अत्यंत विषारी धातू असून तिच्या संपर्काने लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
FDA च्या तपासणीत असे आढळले की, या भांड्यांमधून धोकादायक प्रमाणात शिसं अन्नात मिसळते. शिसं शरीरात गेल्यास खालील गंभीर परिणाम होऊ शकतात.
लहान मुलांमध्ये: वाढ खुंटणे, मेंदूचा विकास मंदावणे, वर्तनातील बदल.
प्रौढांमध्ये: पोटदुखी, थकवा, उलटी, मज्जासंस्थेचे त्रास.
दीर्घकालीन परिणाम: शिसं किडनीमध्ये साठते आणि क्रॉनिक किडनी डिसीजचा धोका वाढतो.
ही भांडी सध्या न्यूयॉर्कमधील मन्नान सुपरमार्केट मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होती. FDA ने त्या सुपरमार्केटला आणि इतर सर्व विक्रेत्यांना ही भांडी विकणे तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, ग्राहकांनाही ही भांडी वापरणे थांबवून ती सुरक्षितपणे नष्ट करण्याचे आवाहन केले आहे.
FDA ने सांगितले की, आपल्या घरी असलेल्या ॲल्युमिनियम किंवा पितळेच्या भांड्यांची तपासणी करा, विशेषतः 'टायगर व्हाईट', 'हिंडालियम' किंवा 'इंडालियम' लेबल असलेली भांडी अधिक धोकादायक असू शकतात. "अशा भांड्यांमध्ये अन्न शिजवणे किंवा ठेवणे टाळा. ती भांडी सुरक्षितपणे दूर ठेवा किंवा नष्ट करा," असा स्पष्ट संदेश FDA ने दिला आहे.
शिसं शरीरात साचल्यास त्याची कोणतीही सुरक्षित पातळी नसते. त्यामुळे अगदी थोड्या प्रमाणातील शिसंदेखील आरोग्य बिघडवू शकते. लहान मुलांची वाढ थांबणे, बौद्धिक क्षमतेवर परिणाम आणि दीर्घकाळातील किडनी विकार यांसारख्या गंभीर समस्या टाळण्यासाठी अशा भांड्यांपासून दूर राहणे गरजेचे आहे.