
नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय बजेट एअरलाइन 'इंडिगो'ला आता नवे बॉस मिळाले आहेत. ब्रिटिश एअरवेजचे माजी प्रमुख राहिलेले विल्यम वॉल्श यांची कंपनीचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून मंगळवारी नेमणूक करण्यात आली. इंडिगोचे आधीचे सीईओ पीटर एल्बर्स यांनी अचानक राजीनामा दिला होता, त्यानंतर अवघ्या तीन आठवड्यांतच ही महत्त्वाची घोषणा झाली आहे.
हवाई वाहतूक क्षेत्रात 'विली' या नावाने ओळखले जाणारे विल्यम वॉल्श हे या क्षेत्रातील एक दिग्गज मानले जातात. त्यांना अनेक दशकांचा अनुभव आहे. सध्या ते आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या (IATA) महासंचालक पदावर कार्यरत आहेत.
IATA मधील त्यांचा कार्यकाळ ३१ जुलै रोजी संपणार आहे. त्यानंतर ३ ऑगस्टपर्यंत ते इंडिगोमध्ये रुजू होतील, असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. डिसेंबर अखेरपर्यंत, इंडिगोचा भारतीय बाजारपेठेत तब्बल ६४% वाटा होता, ज्यामुळे ती देशातील नंबर १ एअरलाइन ठरली आहे.
कंपनीकडे एकूण ४४० विमानं असून, दररोज २२०० पेक्षा जास्त उड्डाणं होतात. इंडिगोची सेवा ९५ देशांतर्गत आणि ४० हून अधिक आंतरराष्ट्रीय शहरांसाठी उपलब्ध आहे. कमी दर आणि वेळेवर उड्डाण यासाठी इंडिगो ओळखली जाते.
या नेमणुकीबद्दल बोलताना इंडिगोचे अध्यक्ष विक्रम सिंह म्हणाले, "विली इंडिगोचं नेतृत्व करणार याचा आम्हाला खूप आनंद आहे. ते एक जागतिक नेते आहेत आणि अनेक एअरलाइन्समध्ये त्यांनी उत्कृष्ट नेतृत्व सिद्ध केलं आहे. मोठ्या कंपन्या सांभाळण्याचा त्यांचा अनुभव या स्पर्धेच्या युगात इंडिगोला आणखी मजबूत करेल."
नवे सीईओ म्हणून वॉल्श यांच्यावर इंडिगोचं संपूर्ण व्यवस्थापन आणि कंपनीची पुढील दिशा ठरवण्याची जबाबदारी असेल. कंपनीची कार्यक्षमता वाढवणं, नेटवर्क आणि व्यावसायिक योजनांचा विस्तार करणं, तसेच प्रवाशांना मिळणारा अनुभव अधिक चांगला करणं ही त्यांची मुख्य उद्दिष्टं असतील.
"हवाई वाहतूक क्षेत्र वेगाने बदलत आहे आणि या बदलांमध्ये इंडिगो आघाडीवर राहण्यासाठी सज्ज आहे. कंपनीतील सहकाऱ्यांसोबत मिळून उत्कृष्टता, नावीन्य आणि शाश्वत मूल्ये निर्माण करण्यासाठी मी उत्सुक आहे," असं विल्यम वॉल्श यांनी सांगितलं.