७ फूट १ इंच उंचीच्या २७ वर्षीय रुमेसा आणि २ फूट १ इंच उंचीच्या ३० वर्षीय ज्योती आमगे... किती कुतूहल आहे ना? या दोघीही जगातील सर्वात उंच आणि सर्वात बुटक्या युवती आहेत. गिनीज रेकॉर्डमध्ये नाव असलेल्या या उंच आणि बुटक्या युवतींची भेट आता झाली आहे. या दोघींच्या भेटीचा हा दुर्मिळ क्षण लंडनच्या प्रतिष्ठित सवॉय हॉटेलमध्ये घडला. या दोघींनी चहाचा आस्वाद घेत आपल्या आयुष्यातील कथा आणि अनुभव शेअर केले. हा व्हिडिओ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
२०२४ च्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड दिन साजरा करण्यासाठी ही भेट आयोजित करण्यात आली होती. जगातील सर्वात उंच आणि सर्वात बुटक्या महिलांची भेट झाल्याने पुन्हा एकदा रेकॉर्डबुकमध्ये नोंद झाली आहे. या दोघींबद्दल सांगायचे झाल्यास, तुर्कस्तानात राहणाऱ्या रुमेसा जगातील सर्वात उंच महिला आहेत आणि त्या वेब डेव्हलपर आहेत. सेंटीमीटरमध्ये सांगायचे झाल्यास, त्यांची उंची २१५.१६ सें.मी. आहे. तर ज्योती आमगे भारतीय असून त्यांची उंची २ फूट १ इंच म्हणजेच ६२.८ सेंटीमीटर आहे.
२०१४ मध्ये रुमेसा १८ वर्षांच्या असताना त्यांचे नाव 'सर्वात उंच किशोरवयीन मुलगी' म्हणून नोंदवले गेले होते. आता, त्यांनी रेकॉर्डमध्ये आणखी एक पाऊल पुढे टाकत जगातील सर्वात उंच महिला म्हणून नाव कमावले आहे. त्यांना वीव्हर सिंड्रोम नावाचा एक दुर्मिळ आजार आहे. त्यामुळे त्यांना बहुतेक वेळा व्हीलचेअरवरच राहावे लागते. वॉकरच्या मदतीने त्या थोडे चालू शकतात.
ज्योती आमगे यांना रुमेसाने 'सुंदर महिला' असे संबोधले आहे. अनेक वर्षांपासून मी या भेटीची वाट पाहत होते, असे त्या म्हणाल्या. या दोघींनी चहा पिताना, मेकअप आणि कपड्यांबद्दल तसेच शरीराच्या काळजीबद्दल चर्चा केली. एवढेच नाही तर दोघींनी आवडते छंद आणि सवयींबद्दलही गप्पा मारल्या. ३० वर्षीय ज्योती आमगे महाराष्ट्रातील नागपूरच्या आहेत. त्यांनी बिग बॉससह अनेक टीवी शो, डॉक्युमेंटरी, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांना सेलिब्रिटीइतकीच लोकप्रियता मिळाली आहे आणि लोणावळ्यातील मेणाच्या पुतळ्यांच्या संग्रहालयात त्यांचा मेणाचा पुतळा आहे.