WhatsApp Web: आयफोन युझर्सना आज सकाळपासून व्हॉट्सॲप वेब वापरताना लॉग-इनमध्ये अडचणी येत आहेत. तर दुसरीकडे, अँड्रॉइड युझर्ससाठी ही सेवा सुरळीत सुरू आहे. नेमकं काय घडलंय, यामागची नेमकी कारणे काय याबद्दल सविस्तर जाणून घ्या…
जगभरात कोट्यवधी लोक व्हॉट्सॲप वापरतात. पण आज सकाळपासून या ॲपमध्ये काही तांत्रिक अडचणी येत आहेत. विशेषतः, कॉम्प्युटरवर वापरल्या जाणाऱ्या 'व्हॉट्सॲप वेब' सेवेत युझर्सना लॉग-इन करता येत नाहीये. 'डाउनडिटेक्टर' या वेबसाईटवर अनेक युझर्सनी याबद्दल तक्रारी केल्या आहेत. या डेटानुसार, 56% युझर्सना व्हॉट्सॲप वेबमध्ये, 39% युझर्सना मोबाईल ॲपमध्ये आणि 6% युझर्सना मेसेज पाठवण्यात समस्या येत आहे.
23
आयफोन (iPhone) युझर्सना अडचणी
ही समस्या सर्वच युझर्सना येत नाहीये. अँड्रॉइड (Android) स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी व्हॉट्सॲप वेब व्यवस्थित काम करत आहे. पण आयफोन (iPhone) युझर्स जेव्हा वेब व्हर्जनवर लॉग-इन करण्यासाठी QR कोड स्कॅन करत आहेत, तेव्हा त्यांना मोठी अडचण येत आहे. सतत 'लॉग-इन एरर' येत असल्यामुळे, ऑफिसच्या कामासाठी व्हॉट्सॲप वेबवर अवलंबून असणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 'X' (पूर्वीचे ट्विटर) सारख्या सोशल मीडियावर अनेक युझर्स, "ही अडचण फक्त मलाच येतेय की सगळ्यांचं व्हॉट्सॲप बंद पडलंय?" असे प्रश्न विचारून आपली नाराजी व्यक्त करत आहेत.
33
व्हॉट्सॲप किंवा मेटा (Meta) कडून या तांत्रिक बिघाडाबद्दल कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण नाही.
डाउनडिटेक्टरच्या डेटानुसार, ही लॉग-इनची समस्या आज सकाळी 8:37 वाजता सुरू झाली. बराच वेळ होऊनही आयफोन युझर्सना आपली डिव्हाइस व्हॉट्सॲप वेबशी लिंक करता आलेली नाही. कित्येक तास ही समस्या कायम असली तरी, हे जागतिक स्तरावरील आऊटेज आहे की फक्त काही भागांपुरते मर्यादित आहे, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. विशेष म्हणजे, व्हॉट्सॲप किंवा त्याची मूळ कंपनी मेटा (Meta) यांनी या तांत्रिक बिघाडाबद्दल अद्याप कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही. ही समस्या लवकरच सुटेल अशी आशा युझर्स व्यक्त करत आहेत.