
मुंबई : महाराष्ट्राचे अन्न आणि औषध प्रशासन (FDA) आयुक्त यांच्या कडक कारवाईची चर्चा आता थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे. टाइम्सने त्यांच्या फ्रंट पेजवर मुंढेंवर एक विशेष लेख छापला असून त्यात त्यांना 'रॉकस्टार' म्हटलंय. या बातमीमुळे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्रात अन्न सुरक्षेबाबत उघडलेल्या मोहिमेकडे सर्वांचं नव्याने लक्ष वेधलं गेलं आहे.
न्यूयॉर्क टाइम्सने "In India, a Food Inspector Is a Rock Star" (भारतात एक फूड इन्स्पेक्टर रॉकस्टार आहे) या मथळ्याखाली ही बातमी दिली आहे. सोबतच "ग्राहक त्यांचा आदर करतात आणि हॉटेल मालक त्यांना घाबरतात" अशी ओळही दिली आहे. या रिपोर्टमध्ये मुंढेंचा उल्लेख 'फूड सेफ्टी सेलिब्रिटी' असा करण्यात आलाय. एरवी कंटाळवाण्या वाटणाऱ्या सरकारी कारवायांना मुंढेंनी कसं लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय बनवलंय, यावर या बातमीत भर देण्यात आला आहे.
नेहमी 'आयएएस सिंघम' म्हणून ओळखले जाणारे मुंढे त्यांच्या धडक आणि तडजोड न करणाऱ्या स्वभावामुळे लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला महाराष्ट्राचे एफडीए आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यापासून, त्यांच्या विभागाने अनेक हॉटेल्स, दुकाने, गोदामे आणि क्विक-कॉमर्स डार्क स्टोअर्सवर अचानक छापे टाकले आहेत. या तपासणीनंतर अनेक बड्या आस्थापनांना टाळे लागले असून काहींचे परवानेही रद्द करण्यात आले आहेत.
"Proud" Moment for Maharashtra💐
"Liberal Leftist" New York Times has featured IAS Tukaram Mundhe on front page under headline, “In India, a Food Inspector Is a Rock Star”
He deserves Ramon Magsaysay Award next.
Earlier, IRS Arvind Kejriwal had received this prestigious award. https://t.co/zwprxNIiAO
— BhikuMhatre (@MumbaichaDon) October 6, 2026
मुंढेंच्या या कारवाईचा फटका अनेक प्रसिद्ध फूड ब्रँड्सनाही बसला आहे. डॉमिनोज आणि पिझ्झा हटच्या किचनमध्ये झुरळे आणि एक्सपायरी डेट संपलेले पदार्थ सापडल्याने त्यांचे आऊटलेट्स तात्पुरते बंद करण्यात आले होते. मुंबईतील अनेक जुन्या आणि प्रसिद्ध हॉटेल्सवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. याशिवाय ब्लिंकिट (Blinkit) आणि झेप्टो (Zepto) सारख्या क्विक-कॉमर्स डार्क स्टोअर्सवर टाकलेल्या छाप्यांमध्येही मुदतबाह्य पदार्थ आणि अस्वच्छता आढळून आली होती.
याआधी बीबीसीनेही (BBC) मुंढेंच्या कामाची दखल घेतली होती आणि आता न्यूयॉर्क टाइम्सने दिलेली बातमी त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेची पावती आहे. त्यांच्या या कडक कारवाईमुळे सरकारी यंत्रणांवरचा लोकांचा विश्वास कसा वाढू शकतो आणि रोजच्या सरकारी कामांना कसा अर्थ प्राप्त होऊ शकतो, यावर आता सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
न्यूयॉर्क टाइम्सच्या या बातमीवर तुकाराम मुंढेंनी एक्स (X) वर आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रसिद्धीपेक्षा काम जास्त महत्त्वाचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यांनी लिहिलंय:
"सुशासन म्हणजे फक्त बातम्यांमध्ये झळकणे नाही, तर लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणे होय."
Good governance is not about making headlines. It is about making a difference.
Food safety is ultimately about protecting people, upholding standards and building public trust.
When enforcement is fair, fearless and consistent, institutions earn credibility and citizens begin to believe that the system works.
The New York Times captures one such story from Maharashtra.
#TukaramMundhe #GoodGovernance #PublicTrust #FoodSafety #PublicService #NYTimes
— Tukaram Mundhe (@Tukaram_IndIAS) October 5, 2026
अन्न सुरक्षा म्हणजे "लोकांचे रक्षण करणे, दर्जा टिकवणे आणि जनतेचा विश्वास जिंकणे" असंही त्यांनी पुढे म्हटलंय. मुंढे म्हणतात, "जेव्हा कारवाई निष्पक्ष, निर्भय आणि सातत्यपूर्ण असते, तेव्हा संस्थांची विश्वासार्हता वाढते आणि सिस्टीम खरंच काम करते, यावर नागरिकांचा विश्वास बसू लागतो."
न्यूयॉर्क टाइम्सने "महाराष्ट्रातील अशीच एक गोष्ट" जगासमोर मांडली आहे, असा संदेश त्यांनी शेवटी दिला.
थोडक्यात सांगायचं तर, एका आंतरराष्ट्रीय वृत्तपत्राने मुंढेंना 'रॉकस्टार' ही पदवी दिली असली, तरी त्यांच्या प्रतिक्रियेवरून हेच स्पष्ट होतं की त्यांचं मुख्य लक्ष प्रसिद्धीवर नसून धडक कारवाई, अन्न सुरक्षा आणि जनसेवेवरच आहे.