हजारो जणांच्या अपहरणात शेख हसीनांचा सहभाग?

हिंदूंवरील अत्याचार आणि अराजकतेमुळे चर्चेत असलेल्या बांगलादेशमध्ये नोंदवलेल्या ३५०० हून अधिक लोकांच्या अपहरण (बळजबरीने बेपत्ता) प्रकरणात माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ढाका : हिंदूंवरील अत्याचार आणि अराजकतेमुळे चर्चेत असलेल्या बांगलादेशमध्ये नोंदवलेल्या ३५०० हून अधिक लोकांच्या अपहरण (बळजबरीने बेपत्ता) प्रकरणात माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा सहभाग असल्याचे याबाबत चौकशीसाठी नेमलेल्या समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे. हसीना यांच्यासोबत, त्यांचे संरक्षण सल्लागार निवृत्त मे. ज. अहमद सिद्दिकींसह इतर अनेक सरकारी अधिकारीही यात सहभागी असल्याचे बांगलादेशच्या हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांना सादर करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?:

मागील शेख हसीना सरकारच्या काळात राजकीय विरोधक, विद्यार्थी आंदोलकांवर सरकारने दडपशाही केली होती. हजारो लोकांना बळजबरीने बेपत्ता करून त्यांना अज्ञात ठिकाणी ठेवून चौकशी केली जात होती, असा गंभीर आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर सध्याच्या हंगामी सरकारने याबाबत चौकशीसाठी समिती नेमली होती. चौकशी करणाऱ्या समितीने, ‘आतापर्यंत १६७६ लोकांच्या अपहरणाबाबत चौकशी करण्यात आली आहे. पुढील मार्चमध्ये याबाबत मध्यावधी अहवाल सादर केला जाईल, ज्यामध्ये अशाच प्रकारे नोंदवलेल्या ३५०० हून अधिक प्रकरणांची माहिती दिली जाईल’ असे म्हटले आहे.

तसेच, ‘अशा बळजबरीने बेपत्ता करण्याच्या घटना अत्यंत पद्धतशीरपणे राबवल्या जात होत्या. त्याचा सुगावा लागू नये म्हणून व्यवस्था तयार करण्यात आली होती’ असेही म्हटले आहे. याचवेळी दहशतवाद निग్రह करण्यासाठी मागील सरकारने स्थापन केलेल्या रॅपिड अॅक्शन बटालियनला बरखास्त करण्याचीही समितीने शिफारस केली आहे. या दलाने मोठ्या प्रमाणात मानवी हक्क उल्लंघन केले आहे, असा आरोप समितीने केला आहे.

युनूस यांचे स्वागत:

अहवालाचे स्वागत करताना हंगामी सरकारचे प्रमुख युनूस म्हणाले, ‘तुम्ही खरोखरच खूप महत्त्वाचे काम करत आहात. तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व प्रकारचे सहकार्य देण्यास आम्ही तयार आहोत’ असे समितीला सांगितले.

Share this article