
मिशिगन : एका व्हर्च्युअल इंटरव्ह्यू दरम्यान कॅन्डिडेटने स्वतःचा चेहरा बदलण्यासाठी चक्क रिअल-टाइम फेस फिल्टर वापरल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामुळे नोकरभरती प्रक्रियेत आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) च्या वाढत्या गैरवापराबाबत नवी चिंता निर्माण झाली आहे.
मिशिगनमधील रिक्रूटर जेसन एका रिमोट जॉबसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेत होते. त्यावेळी त्यांचा सामना पहिल्या 'डीपफेक कॅन्डिडेट'शी झाला. सुरुवातीपासूनच हा उमेदवार थोडा संशयास्पद वाटत होता, पण त्याच्या चेहऱ्यावरील गडबड सर्वात आधी जेसनच्या सहकाऱ्याने ओळखली.
जेसनने एक्स (X) वर एका पोस्टमध्ये लिहिलंय, "काल एका इंटरव्ह्यूमध्ये माझ्यासोबत खूपच विचित्र प्रकार घडला. मी माझ्या पहिल्या डीपफेक कॅन्डिडेटची मुलाखत घेतली. मला हा प्रकार समजायला थोडा वेळ लागला."
"माझ्या सहकाऱ्याच्या लक्षात आलं की त्या उमेदवाराचा चष्मा थोडा विचित्र दिसत होता. त्याच्या गालावर चष्म्याची दुसरी अस्पष्ट फ्रेम दिसत होती. तो संपूर्ण इंटरव्ह्यूमध्ये लाईव्ह फेस फिल्टर वापरत होता," असं जेसनने सांगितलं.
The craziest thing happened to me in an interview yesterday.
I interviewed my first deep fake candidate. It took me a bit to catch on.
My coworker noticed his glasses looked off.... there was a second ghost frame smeared across his cheeks. He'd been running a live face filter the whole interview
So I asked him to put his hand in front of his face. He put it up right NEXT to his face lol, never in front. Asked again, still wouldn't do it
He looked a little different from his linked in and his github (which I wont link here) hiring and interviewing is so ridiculous now.
In the days of AI we're going to have to be more careful.. and forced to move to in person interviews.
— Loktar 🇺🇸 (@loktar00) October 16, 2026
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, उमेदवार आपला चेहरा लपवण्यासाठी डिजिटल फिल्टर वापरत आहे का, हे तपासण्यासाठी जेसन इंटरव्ह्यू थांबवताना दिसतो. त्याने उमेदवाराला त्याच्या चेहऱ्यासमोर हात हलवण्यास सांगितलं. या साध्या कृतीमुळे फिल्टरच्या ट्रॅकिंगमधील त्रुटी सहज उघड होऊ शकल्या असत्या.
जेसनने स्वतः व्यावसायिक कुस्तीपटू जॉन सीनाची प्रसिद्ध 'यू कान्ट सी मी' (You Can't See Me) स्टाईल करून दाखवली. पण, त्या उमेदवाराने आपला हात थेट चेहऱ्यासमोर आणणं टाळलं, ज्यामुळे जेसनचा संशय आणखी बळावला.
जेसन त्याला म्हणाला, "तू माझं एक काम करू शकतोस का? तुझा हात तुझ्या चेहऱ्यासमोर आणशील का? जसं मी आता करतोय. अगदी जुन्या जॉन सीनासारखं, यू कान्ट सी मी."
"मी त्याला चेहऱ्यासमोर हात ठेवायला सांगितला. पण त्याने तो चेहऱ्याच्या बाजूला ठेवला, समोर नाही. पुन्हा विचारलं, तरीही त्याने तसं केलं नाही. तो त्याच्या लिंक्डइन आणि गिटहब (ज्याची लिंक मी इथे देणार नाही) प्रोफाईलवरील फोटोपेक्षा थोडा वेगळा दिसत होता. आता नोकरभरती आणि मुलाखती खूपच विचित्र झाल्या आहेत. एआयच्या (AI) काळात आपल्याला अधिक सावध राहावं लागेल आणि पुन्हा प्रत्यक्ष मुलाखतींकडे (in-person interviews) वळावं लागेल," असंही जेसनने पुढे म्हटलं.
उमेदवाराचा चेहरा त्याच्या लिंक्डइन आणि गिटहब प्रोफाईलवरील फोटोंशी जुळत नसल्याचंही जेसनने निदर्शनास आणून दिलं. त्याने उमेदवाराच्या प्रोफाईलच्या लिंक्स शेअर न करण्याचा निर्णय घेतला असला तरी, या घटनेमुळे रिमोट हायरिंग दरम्यान उमेदवारांची ओळख कशी पडताळायची, यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
उमेदवाराचं संशयास्पद वागणं ओळखल्याबद्दल अनेक सोशल मीडिया युजर्सनी जेसनचं कौतुक केलं आहे. काहींनी त्याला त्या उमेदवाराचं नाव जाहीर करण्याची विनंती केली, तर काहींच्या मते नोकरी शोधताना लोक आता किती विचित्र मार्ग अवलंबू शकतात, हे या घटनेतून दिसून येतं.
एका युजरने लिहिलं, "तुम्ही त्या फेक माणसाची लिंक उघड करायला हवी. एका स्कॅमरची प्रायव्हसी का जपायची? त्याचा प्रायव्हसी डेटाही खोटा असू शकतो."
दुसऱ्या एका युजरने कमेंट केली, "अडचणीच्या काळात लोक काहीही करतात. पण त्याने जो प्रयत्न केला, त्यासाठी मी त्याला दाद देईन."