अमेरिकेच्या मेरीलँडमधील नासाने आपल्या सूर्यमालेबाहेरून आलेल्या 3I/ॲटलस (Comet 3I/ATLAS) या तिसऱ्या आंतरतारकीय वस्तूचे आतापर्यंतचे सर्वात स्पष्ट आणि जवळचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. हबल, जेम्स वेब, मंगळ ग्रहाचे उपग्रह यांच्यासह 12 हून अधिक अंतराळयान आणि दुर्बिणींनी मिळून हे फोटो काढले आहेत. हा धूमकेतू आपल्या सूर्यमालेपेक्षा अनेक पटींनी जुना असू शकतो, असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे. चिलीमधील ATLAS दुर्बिणीद्वारे जुलैमध्ये पहिल्यांदा शोध लागल्यापासून खगोलशास्त्रज्ञ या धूमकेतूवर सतत संशोधन करत आहेत.
खगोलशास्त्रज्ञ 3I/ॲटलसला आंतरतारकीय जगातून आलेला पाहुणा म्हणत आहेत. बुधवारी नासाच्या गोडार्ड स्पेस सेंटरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत हे नवीन, उच्च-गुणवत्तेचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले. त्याचा मार्ग आणि वैशिष्ट्यपूर्ण हालचालीमुळे हा एक सामान्य धूमकेतू नाही, तर परग्रहावरील तांत्रिक वस्तू असू शकते, अशी माहिती पूर्वी पसरली होती. त्यामुळे या खगोलीय वस्तूने सामान्य नागरिक आणि उत्साही लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. पण नासाच्या अधिकाऱ्यांनी या शक्यता पूर्णपणे फेटाळून लावल्या. काही असामान्य रासायनिक वैशिष्ट्ये असली तरी, तो सामान्य धूमकेतू सारखाच वागतो, असे त्यांनी स्पष्ट केले.