
टोकियो : रशियाच्या पूर्व किनाऱ्यावर आलेल्या 8.7 तीव्रतेच्या भूकंपानंतर होनोलुलू शहरात त्सुनामीच्या सायरनचा आवाज ऐकू आला आणि नागरिकांना उंच ठिकाणी जाण्याचा इशारा देण्यात आला.
होनोलुलूच्या काही परिसरांमध्ये वाहतूक कोंडी झाली होती, तर ओहू बेटावरील वायानाई या किनारपट्टी भागातून सुरक्षिततेसाठी नागरिकांना बाहेर काढण्यासाठी डोंगर मार्ग खुला करण्याची तयारी सुरू होती, अशी माहिती राज्याचे प्रतिनिधी डेरियस किला यांनी दिली. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू असल्या तरी काही शाळांनी क्रीडा व इतर उपक्रम रद्द केल्याची सूचना दिली.
पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने हवाई, चिली, जपान आणि सोलोमन बेटे या भागांमध्ये समुद्रसपाटीपेक्षा 1 ते 3 मीटर उंच लाटा येण्याची शक्यता व्यक्त केली. रशिया आणि इक्वाडोरच्या काही किनाऱ्यांवर 3 मीटरहून अधिक उंच लाटा येऊ शकतात.
जपानच्या हवामान खात्यानेही त्सुनामीचा इशारा देत उत्तर जपानच्या किनाऱ्यावर अल्प वेळातच 3 मीटर लाटा येऊ शकतात, असे म्हटले आहे. हवाईच्या सर्व बेटांवर किनाऱ्यांवर नुकसान होण्याची शक्यता असल्याचा इशाराही देण्यात आला.
"जीवन आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी त्वरित पावले उचलावीत," असा इशारा देण्यात आला आहे. स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ७ वाजता पहिल्या लाटा पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली.
भूकंप स्थानिक वेळेनुसार सकाळी ८:२५ वाजता झाला आणि त्याची तीव्रता सुरुवातीला 8.0 एवढी असल्याचे जपान व अमेरिकेच्या भूगर्भशास्त्रज्ञांनी सांगितले, नंतर ती सुधारून 8.7 एवढी असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार भूकंप जमिनीपासून 19.3 किलोमीटर (12 मैल) खोल झाला.
हा भूकंप जपानच्या होक्काइडो बेटापासून 250 किलोमीटर (160 मैल) अंतरावर झाला होता, आणि तेथे तो हलक्याच प्रमाणात जाणवला, असे एनएचके टेलिव्हिजनने सांगितले.
रशियाच्या तास्स वृत्तसंस्थेनुसार भूकंपकेंद्राजवळील सर्वात मोठ्या शहरात – पेट्रोपावलोव्ह्स्क-कामचात्स्की येथे – अनेक लोक घराबाहेर पळून गेले. घरातील कपाटे कोसळली, आरसे फुटले, रस्त्यांवरील गाड्या हलू लागल्या आणि इमारतींच्या बाल्कन्याही थरथरल्या.
कॅमचाट्का प्रांताच्या राजधानीत वीज आणि मोबाईल सेवा खंडित झाल्याचेही तास्सने सांगितले. सखालिन बेटावर नागरिकांचे स्थलांतर सुरू असून आपत्कालीन सेवाही पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचे एका स्थानिक अधिकाऱ्याने सांगितले.
अलास्कामधील नॅशनल त्सुनामी वॉर्निंग सेंटरने अलास्काच्या अलेउशियन बेटांमध्ये त्सुनामीचा इशारा दिला असून, कॅलिफोर्निया, ओरेगॉन, वॉशिंग्टन व हवाईच्या किनारी भागांमध्ये त्सुनामी वॉच जारी केला आहे. तसेच अलास्काच्या मोठ्या किनाऱ्यावरही सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याआधी जुलै महिन्यात कामचाट्का समुद्राजवळ सलग पाच शक्तिशाली भूकंप झाले होते. त्यातील सर्वात मोठा भूकंप 7.4 तीव्रतेचा होता, जो जमिनीपासून 20 किलोमीटर खोलीवर आणि पेट्रोपावलोव्ह्स्क-कामचात्स्की शहरापासून 144 किलोमीटर अंतरावर झाला होता.
४ नोव्हेंबर १९५२ रोजी कामचाट्कामध्ये ९.० तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्यावेळी हवाईमध्ये ९.१ मीटर (३० फूट) उंच लाटा आल्या होत्या, मात्र कोणत्याही मृत्यूची नोंद नव्हती.