
Israel Launches Secret Lebanon Raid : इस्रायलने आपला अधिकारी रोन अराड याचे अवशेष परत आणण्यासाठी लेबनॉनमध्ये एक मोठी लष्करी कारवाई केली आहे. सुमारे 40 वर्षांपूर्वी हिजबुल्लाह दहशतवाद्यांनी अराडला पकडले होते आणि नंतर त्याचा मृत्यू झाला होता. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या आदेशानंतर शनिवारी रात्री इस्रायली कमांडोंनी लेबनॉनमध्ये घुसून ही कारवाई केली. मात्र, त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
16 ऑक्टोबर 1986 रोजी इस्रायलचे एक लढाऊ विमान तांत्रिक बिघाडामुळे लेबनॉनमध्ये कोसळले होते. त्यावेळी पायलटला वाचवण्यात यश आले, पण शस्त्र अधिकारी (weapons systems officer) रोन अराड बेपत्ता झाले. काही काळानंतर, अराड लेबनॉनमधील दहशतवाद्यांच्या ताब्यात असल्याचे फोटो समोर आले होते.
त्यांच्या सुटकेचे प्रयत्न अयशस्वी ठरले आणि 1990 च्या दशकातच त्यांचा मृत्यू झाल्याचे मानले जाते. 'त्यांना जिवंत परत आणू शकलो नाही, पण त्यांचे अवशेष नक्की परत आणू,' असे आश्वासन नेतन्याहू यांनी दिले होते. त्यानुसार, इराणसोबतच्या तणावाच्या परिस्थितीतही त्यांनी या विशेष मोहिमेचे आदेश दिले.
या मोहिमेअंतर्गत, 4 हेलिकॉप्टरमधून इस्रायली कमांडो सीरिया-लेबनॉन सीमेवरील हिजबुल्लाहचा गड मानल्या जाणाऱ्या नबी चिट (Nabichit) शहरात घुसले. जिथे अराड यांना दफन केले होते, त्या ठिकाणी त्यांनी अवशेष शोधण्यासाठी खोदकाम केले. पण अनेक प्रयत्न करूनही काहीही सापडले नाही आणि पथक रिकाम्या हाताने परतले.
या कारवाईदरम्यान इस्रायली कमांडो आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार गोळीबार झाला. कमांडोंना संरक्षण देण्यासाठी इस्रायली हवाई दलाने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये 41 हून अधिक जण ठार झाल्याचे म्हटले जात आहे.
वॉशिंग्टन: इराणला अणुबॉम्ब बनवण्यापासून रोखण्यासाठी अमेरिका आणि इस्रायल आता एक मोठी योजना आखत आहेत. इराणमधील समृद्ध युरेनियम (HEU) जप्त करण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी संयुक्त कमांडो कारवाई करण्याचा विचार दोन्ही देश करत आहेत.
अणुबॉम्ब बनवण्यासाठी आवश्यक असलेले 450 किलो युरेनियम इराणने जमा केले आहे. यापैकी 60% युरेनियम समृद्ध (enriched) आहे. जर हे प्रमाण 90% पर्यंत पोहोचले, तर इराण काही आठवड्यांत 11 अणुबॉम्ब बनवण्याची क्षमता प्राप्त करेल.
याच पार्श्वभूमीवर, काही काळापूर्वी अमेरिका आणि इस्रायलने इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांची हत्या केल्याचा दावा केला होता. आता त्याचाच पुढचा भाग म्हणून इराणच्या अणुप्रकल्पांवर कमांडो कारवाई करून युरेनियम जप्त करण्याची योजना आखली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इराण आपल्या इस्फहान, फोर्डो आणि नतान्झ येथील अणुप्रकल्पांमध्ये युरेनियम समृद्ध करण्याचे काम करत आहे. याच कारणामुळे, नतान्झ अणुप्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर यापूर्वीच संयुक्त बॉम्बहल्ला करण्यात आला होता, जेणेकरून तेथील युरेनियम बाहेर नेणे शक्य होणार नाही.
दोन पर्याय: सध्या अमेरिका आणि इस्रायलसमोर दोन पर्याय आहेत. एकतर इराणमधील युरेनियमचा साठा जप्त करणे किंवा त्याच ठिकाणी तो नष्ट करणे.