
Operation Sindoor : जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप भारतीय पर्यटकांचा बळी गेला आणि त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. या भ्याड हल्ल्याला ठोस प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने इतिहासातील एक निर्णायक पाऊल उचलले ऑपरेशन सिंदूर. 7 मेच्या मध्यरात्री बरोबर 2 वाजता, भारतीय वायूदलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (PoK) येथील 9 दहशतवादी तळांवर अचूक हवाई हल्ला केला. बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद येथील ठिकाणं या कारवाईत उद्ध्वस्त करण्यात आली. भारताने याच तळांवरून देशावर हल्ल्याचा कट रचला जात असल्याचा ठोस पुरावा मिळवल्यानंतर ही कारवाई केली.
भारतीय हल्ल्यांनंतर पाकिस्तानमधील अनेक भागांत घबराट पसरली असून, मशीदींमधून नागरिकांना घरं सोडून सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सरकारनेच मशिदींमार्फत नागरिकांना तात्काळ सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. अनेक भागांमध्ये लोक घरं रिकामी करून सुरक्षित भागांत स्थलांतर करत आहेत.
भारताच्या जोरदार कारवाईमुळे पाकिस्तान गोंधळलेल्या अवस्थेत आहे. लाहोर विमानतळावर तात्काळ आणीबाणी लागू करण्यात आली असून, प्रवाशांना तात्काळ परिसर रिकामं करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द करण्यात आली असून, काही विमानं वळवण्यात आली आहेत.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारतावर महिलांवर गोळीबार आणि मशिदी उद्ध्वस्त केल्याचा गंभीर आरोप केला आहे. मात्र भारताने यावर स्पष्ट केले की सर्व लक्ष्य केवळ दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर केंद्रित होती आणि कोणत्याही नागरी ठिकाणाला धक्का पोहोचलेला नाही.
भारताने हा हल्ला आत्मरक्षणासाठी आणि देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. पाहलगाम हल्ल्यानंतर देशभरात निर्माण झालेला रोष आणि दहशतवाद्यांना धडा शिकवण्याची गरज या कारवाईमागचं प्रमुख कारण ठरलं.
'ऑपरेशन सिंदूर'मुळे भारताने पुन्हा एकदा दाखवून दिलं की, देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही कारवाई करण्यास तो मागे हटणार नाही. पाकिस्तानला याचा ठोस प्रत्यय आला आहे आणि आता ते परिणाम भोगत आहेत.