
How Irans Mosaic Defense System Counters US Israel Attacks : अमेरिकेला वाटलं होतं की इस्रायलसोबत मिळून इराणवर मोठा हवाई हल्ला करू, सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना संपवू आणि व्हेनेझुएलासारखं तिथेही सत्तापालट घडवून आणू. पण झालं उलटंच. युद्धाला दोन आठवडे उलटून गेले तरी इराण अजूनही पूर्ण ताकदीने लढतोय. अनेक मोठे नेते मारले जाऊनही त्यांचा जोश कमी झालेला नाही. हे पाहून अमेरिकाही चक्रावून गेली आहे.
यामागचं कारण म्हणजे इराणची खास लष्करी रणनीती, जी तयार केली आहे मेजर जनरल मोहम्मद अली जाफरी यांनी. याला 'मोझॅक' डिफेन्स सिस्टीम म्हणतात. याच सिस्टीममुळे इराण अमेरिकेला भारी पडतोय, अशी माहिती समोर आली आहे.
इराणच्या सैन्याने 'मोझॅक डिफेन्स' नावाचं एक खास मॉडेल स्वीकारलं आहे. कोणत्याही हल्ल्याला तोंड देण्याची ताकद या मॉडेलमुळे सैन्याला मिळाली आहे. मोहम्मद अली जाफरी यांना या प्रणालीचे शिल्पकार मानलं जातं. ते २००७ ते २०१९ पर्यंत इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे प्रमुख होते. त्यांनी इराण-इराक युद्धात (१९८०-१९८८) प्रत्यक्ष सहभाग घेतला होता.
१९९२ मध्ये ते गार्ड्सच्या भूदल विभागाचे प्रमुख बनले. २००५ मध्ये, ते IRGC च्या स्ट्रॅटेजिक स्टडीज सेंटरचे संचालक झाले. तिथे त्यांनी इराण-इराक युद्ध आणि २००३ मध्ये अमेरिकेने इराकवर केलेल्या हल्ल्याच्या रणनीतीचा अभ्यास केला. याच अभ्यासाच्या आधारावर त्यांनी 'मोझॅक' प्रणाली विकसित केली. २००७ मध्ये IRGC चे कमांडर-इन-चीफ झाल्यावर त्यांनी ही प्रणाली संपूर्ण देशात लागू केली.
'मोझॅक' म्हणजे इराणची संरक्षण व्यवस्था एकाच केंद्रीय कमांडवर अवलंबून नाही. ती अनेक प्रादेशिक आणि स्वतंत्र युनिट्समध्ये विभागलेली आहे. यामध्ये IRGC, लष्कर, क्षेपणास्त्र दल, नौदल आणि स्थानिक कमांड सिस्टीम अशा अनेक युनिट्सचा समावेश आहे. एकट्या IRGC मध्येच ३१ प्रांतीय युनिट्स आहेत.
प्रत्येक युनिटकडे स्वतःची स्वतंत्र शस्त्रं, गुप्तचर यंत्रणा आणि कमांड सिस्टीम आहे. त्यामुळे, जर एका युनिटवर हल्ला झाला, तरी बाकीचे युनिट्स आपलं काम सुरूच ठेवतात. अगदी सर्वोच्च नेते मारले गेले तरी व्यवस्थेवर काहीही परिणाम होत नाही. याच तंत्रामुळे अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यालाही इराण पुरून उरला आहे, असं विश्लेषक सांगतात.
इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी खामेनी यांच्या मृत्यूनंतरही म्हटलं होतं, "आमची संरक्षण रणनीती ही दोन दशकांच्या अभ्यासाचं फळ आहे. आमच्या पूर्वेला आणि पश्चिमेला अमेरिकन सैन्याचा पराभव कसा झाला, याचा अभ्यास करून आम्ही त्यातून धडे घेतले आहेत. राजधानीवर बॉम्ब हल्ला झाला तरी आमच्या युद्ध करण्याच्या क्षमतेवर कोणताही परिणाम होणार नाही. या विकेंद्रित मोझॅक संरक्षण प्रणालीमुळे, युद्ध कधी आणि कसं संपवायचं हे आम्हीच ठरवतो." त्यांच्या या वक्तव्यावरून या रणनीतीचं महत्त्व लक्षात येतं.