
Britain May Get First Muslim PM : अमेरिकेतील हाय-प्रोफाइल एपस्टाईन लैंगिक घोटाळ्याच्या वादळामुळे ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर राजीनामा देऊ शकतात. गृहमंत्री शबाना महमूद नव्या पंतप्रधान होऊ शकतात, अशी चर्चा ब्रिटनमध्ये सुरू आहे.
पाकिस्तानी वंशाच्या शबाना पंतप्रधान झाल्यास, त्या ब्रिटनच्या पहिल्या मुस्लिम पंतप्रधान ठरतील. यापूर्वी भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान होते. सादिक खान लंडनचे महापौर बनून लंडनचे पहिले पाकिस्तानी वंशाचे महापौर ठरले होते.
एपस्टाईन घोटाळ्यात नाव असलेल्या मेंडलसन यांची स्टार्मर यांनी ब्रिटनचे अमेरिकेतील राजदूत म्हणून नियुक्ती केली होती. ही नियुक्ती स्टार्मर यांनी केली असली तरी, ती आपल्या सल्ल्यानुसार झाल्याचे सांगत स्टार्मर यांचे जवळचे सल्लागार मॉर्गन मॅकस्वीनी यांनी रविवारी राजीनामा दिला. तरीही, नियुक्ती स्टार्मर यांनी केल्यामुळे त्यांच्या राजीनाम्यासाठीही दबाव वाढत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे शबाना यांचे नाव आघाडीवर आहे.
शबाना महमूद या ब्रिटनच्या गृहमंत्री म्हणून काम करणाऱ्या पहिल्या मुस्लिम महिला आहेत. 1980 मध्ये बर्मिंगहॅममध्ये पाकिस्तानी पालकांच्या पोटी जन्मलेल्या शबाना यांनी त्यांचे बालपण सौदी अरेबियामध्ये घालवले. त्यानंतर त्या पुन्हा ब्रिटनला परतल्या आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेतले.