
Asim Munir Appointed Pakistans First Chief of Defence Forces : पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी गुरुवारी लष्करप्रमुख, फील्ड मार्शल असीम मुनीर यांना पाच वर्षांसाठी पाकिस्तानचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस बनवण्यास मंजुरी दिली. राष्ट्रपती झरदारी यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सादर केलेल्या प्रस्तावाला अधिकृत मंजुरी दिली, ज्यामध्ये त्यांना चीफ ऑफ आर्मी स्टाफ (COAS) असीम मुनीर यांची पाकिस्तानचे पहिले CDF म्हणून औपचारिकपणे नियुक्ती करण्यास सांगितले होते.
गेल्या महिन्यात, पाकिस्तानी संसदेने २७ वी घटनादुरुस्ती मंजूर केली होती, ज्यामध्ये CDF पद निर्माण करण्याची तरतूद होती. याचा उद्देश कमांडमध्ये एकजूट आणणे आणि कोणत्याही कठीण परिस्थितीत त्वरित निर्णय घेणे हा आहे. फील्ड मार्शल असीम मुनीर यांना नोव्हेंबर २०२२ मध्ये ३ वर्षांसाठी लष्करप्रमुख बनवण्यात आले होते, परंतु नंतर २०२४ मध्ये त्यांचा कार्यकाळ ५ वर्षांसाठी वाढवण्यात आला.
पाकिस्तानच्या राष्ट्रपती कार्यालयाकडून जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, "राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी चीफ ऑफ आर्मी स्टाफ असीम मुनीर यांची पुढील ५ वर्षांसाठी चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस म्हणून नियुक्ती करण्यास मंजुरी दिली आहे." सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहबाज शरीफ यांनी मुनीर यांना चीफ ऑफ आर्मी स्टाफ (COAS) आणि चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस, ही दोन्ही पदे देण्याची शिफारस केली होती. एअर चीफ मार्शल जहीर अहमद बाबर सिद्धू यांच्यासाठी दोन वर्षांच्या मुदतवाढीलाही मंजुरी देण्यात आली आहे. ही वाढ मार्च २०२६ मध्ये त्यांचा सध्याचा ५ वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर लागू होईल.
पाकिस्तानच्या रावळपिंडीमध्ये जन्मलेल्या असीम मुनीर यांनी १९८६ पासून आपल्या लष्करी कारकिर्दीला सुरुवात केली. ऑफिसर्स ट्रेनिंग स्कूल प्रोग्रामद्वारे त्यांना पाकिस्तानी सैन्यात प्रवेश मिळाला. २४ नोव्हेंबर २०२२ रोजी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी त्यांची लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती केली. यापूर्वी मुनीर यांनी जून २०१९ ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत गुजरांवाला येथे फील्ड कोरची कमान सांभाळली होती.
मुनीर यांचे वडील सय्यद सरवर रावळपिंडीतील एफजी टेक्निकल हायस्कूलचे प्राचार्य आणि ढेरी हसनाबाद येथील मशीद अल-कुरैशचे इमाम होते. मुनीर यांचे सुरुवातीचे शिक्षण इस्लामी मदरशा दार-उल-तजवीद येथून झाले. नंतर त्यांनी नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटी, इस्लामाबाद येथून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. येथूनच त्यांनी पब्लिक पॉलिसी अँड स्ट्रॅटेजिक सिक्युरिटी मॅनेजमेंटमध्ये एमफिलची पदवी घेतली.