पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ५० ठार

हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही गटाने घेतलेली नसली तरी, बंदी घालण्यात आलेल्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या दहशतवादी संघटनेचा या हल्ल्यात सहभाग असल्याचा संशय आहे.

इस्लामाबाद: पाकिस्तानात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ५० जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी खैबर पख्तूनख्वा प्रांतातील कुर्रम जिल्ह्यात ही घटना घडली. दहशतवाद्यांनी अनेक वाहनांवर गोळीबार केला. मृतांमध्ये बहुतेक शिया समाजातील लोक आहेत. पाराचिनारहून पेशावरला जाणाऱ्या वाहनांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. कुर्रमचे उपायुक्त जावेद उल्ला मेहसूद यांनी ४५ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली.

हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही गटाने घेतलेली नसली तरी, बंदी घालण्यात आलेल्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या दहशतवादी संघटनेचा या हल्ल्यात सहभाग असल्याचा संशय आहे. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली जरदारी यांनी हल्ल्याची निंदा केली आहे. हा हल्ला भ्याड आणि अमानवीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दोषींना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही हल्ल्याची निंदा केली आहे. हा निष्पाप नागरिकांवरचा क्रूर हल्ला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

देशाच्या शांततेचे शत्रूंनी निष्पाप नागरिकांवर हल्ला केला आहे. देशविरोधी शक्तींचे शांतता भंग करण्याचे सर्व प्रयत्न हाणून पाडले जातील, असे ते म्हणाले. खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री महमूद खान यांनीही हल्ल्याची निंदा केली आहे. या भागात शिया-सुन्नी संघर्ष नेहमीच होत असतात.

ऑक्टोबरमध्ये झालेल्या अशाच एका हल्ल्यात महिला आणि मुलांसह १६ जणांचा मृत्यू झाला होता. सप्टेंबरमध्ये शिया आणि सुन्नी जमातींमध्ये जमीन वादावरून झालेल्या संघर्षात ५० हून अधिक लोक मारले गेले होते आणि १२० जण जखमी झाले होते.

Share this article