
नवी दिल्ली: देशातील वाहनधारकांसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. आता तुम्हाला प्रत्येक वेळी टोल प्लाझावर थांबून टोल भरायची गरज नाही. 15 ऑगस्ट 2025 पासून, कार, जीप आणि व्हॅनसारख्या खाजगी वाहनांसाठी ‘FASTag वार्षिक पास’ उपलब्ध होणार आहे. यामुळे वारंवार टोल भरण्याची कटकट संपणार असून, प्रवास अधिक झपाट्याने आणि अखंड होणार आहे.
नवीन ‘FASTag Annual Pass’ ही योजना खास खाजगी वाहनांसाठी तयार करण्यात आली आहे. याच्या अंतर्गत, वाहनधारकांना फक्त एकदाच 3,000 रुपये शुल्क भरावे लागेल, आणि हा पास एक वर्ष किंवा 200 ट्रिप्स जे आधी पूर्ण होईल तेव्हापर्यंत वैध राहील. यामुळे नियमित टोल देणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हा पास टोल प्लाझाच्या 60 किमी परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी विशेषतः उपयुक्त ठरणार आहे. आजवर त्यांना दरवेळी टोल भरावा लागत होता, पण आता या पासमुळे त्यांना वर्षभर प्रवास अधिक सुलभ आणि स्वस्त होणार आहे.
सध्या खाजगी वाहनधारक मासिक टोल पास घेतात, ज्याची किंमत दरमहा 340 रुपये आहे. म्हणजेच वर्षाला 4,080 रुपये खर्च. शिवाय, तो पास फक्त एका टोल प्लाझासाठीच वैध असतो. त्याच्या तुलनेत, नवीन वार्षिक FASTag पास देशभरातील टोल प्लाझांसाठी वैध असेल त्यामुळे हा पर्याय अधिक किफायतशीर, व्यापक आणि सोयीचा आहे.
हा वार्षिक पास ‘राजमार्ग यात्रा’ अॅप, तसेच NHAI व MoRTH च्या अधिकृत पोर्टल्सवरून मिळवता येणार आहे. याठिकाणी एक विशेष सेक्शन तयार केला जाईल, जिथून वापरकर्ते हा पास सक्रिय किंवा नूतनीकरण करू शकतील.
टोल टॅक्समधून वारंवार सुटका
एकदाच 3,000 रुपये भरून वर्षभर प्रवास
200 ट्रिप्सपर्यंत वैध
देशभरातील टोल प्लाझावर लागू
मासिक पासपेक्षा अधिक स्वस्त आणि सोयीचा
टोलवर होणारी वाहतूक कोंडीही होणार कमी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली रस्ते व महामार्ग विभाग सातत्याने नव्या सुधारणांवर काम करत आहे. नवीन FASTag वार्षिक पास ही योजना केवळ वाहनचालकांचा वेळ आणि पैसा वाचवणार नाही, तर टोल व्यवस्थेतील गुंतागुंतही संपवणार आहे.