सीरियातील बशर अल-असद यांच्या पलायनानंतर इस्रायलने तेथे हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. इस्रायली हवाई दलाने सोमवारी सीरियामध्ये १०० हून अधिक हवाई हल्ले केले.
वृत्तानुसार, सीरियाची राजधानी दमास्कसजवळील बरजाह वैज्ञानिक संशोधन केंद्राजवळ हे इस्रायली हल्ले झाले.
इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिडॉन सार म्हणाले की, आम्ही सीरियातील शस्त्रास्त्र तळांवर हल्ला केला. असद सरकारने येथे रासायनिक शस्त्रे लपवून ठेवल्याची भीती पाश्चात्य देशांना वाटते.
५० वर्षांत प्रथमच इस्रायलने सीरियाची सीमा ओलांडून गोलान हाइट्स भागात आपले सैन्य पाठवून बफर झोन ताब्यात घेतला होता.
इस्त्रायली सैन्य आता दक्षिण सीरियातील कटाना शहरात पोहोचले आहे, जे दमास्कसपासून २१ किमी अंतरावर आहे. इस्त्रायली सैनिक दमास्कस बाहेरील अनेक गावांमध्ये घुसल्याचा दावा केला जात आहे.
इस्रायलपूर्वी अमेरिकेने मध्य सीरियातील दहशतवादी संघटना ISIS च्या ठिकाणांवर ७५ हून अधिक हल्ले केले. या हल्ल्यात आयएसआयएसचे अनेक दहशतवादी आणि त्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले.
हयात तहरीर अल-शाम या बंडखोर गटाने सीरियात ताबा मिळवला आहे. राष्ट्राध्यक्ष असद यांनी देश सोडल्यानंतर सीरियन नागरिकांनी त्यांच्या घरात घुसून मोठ्या प्रमाणात लुटमार केली.
सीरियातील असद सरकारच्या पतनानंतर, हयात तहरीर अल-शाम या बंडखोर गटाचा नेता अबू मोहम्मद अल-जुलानी यांनी दमास्कसमधील मशिदीत लोकांना संबोधित केले.
सीरियात लष्कर आणि बंडखोरांमध्ये २७ नोव्हेंबरपासून संघर्ष सुरू झाला होता. त्याच वेळी, १ डिसेंबर रोजी बंडखोर गट HTS ने अलेप्पो शहर आणि ५ तारखेला हमा शहर ताब्यात घेतले.
६ डिसेंबर रोजी दारा आणि ७ रोजी सीरियातील होम्स शहर ताब्यात घेतले. यानंतर, ८ डिसेंबर रोजी बंडखोर गटाच्या सैनिकांनी राजधानी दमास्कसमध्ये प्रवेश केला आणि विजय संपादन केला.