बुधवारी गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाला जाणाऱ्या नीलकमल या प्रवासी बोटीला एका स्पीड बोटीने जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू तर १०० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
इंजिनाची चाचणी करताना उरण-करंजाजवळ दुपारी ४ च्या सुमारास नौदलाच्या स्पीड बोटीचे नियंत्रण सुटून ती नीलकमल या प्रवासी बोटीला धडकली.
या दुर्घटनेत १ नौदल कर्मचारी, नौदलाचे दोन अधिकारी यांच्यासह १३ जणांचा मृत्यू झाला. तर ९९ जणांना वाचवण्यात यश आले. बोटीत सव्वाशेहून अधिक प्रवासी आणि कर्मचारी होते.
या अपघातातून वाचलेले कर्नाटकचे प्रवासी अशोक राव यांनी सांगितले की, बोट धडकल्यानंतर बोटीत पाणी शिरले. लाइफ जॅकेट घालेपर्यंत बोट उलटली. मला पोहता येत असल्याने मी पोहत पुढे आलो.
राव पुढे म्हणाले, अपघातनंतर ३० मिनिटे तिथे कोणीच फिरकले नाही. मी पोहत गेट वे ला पोहचलो. येथे रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती.
राव म्हणाले, बोटीवर १० ते १५ लहान मुले होती. त्यांनाही जीव वाचवण्यासाठी तडफडताना पाहिले. डोळ्यांदेखत काहींचा मृत्यू पाहिला. मात्र माझा जीव वाचला.
कुमार म्हणाला, आम्ही वरच्या डेकवरून प्रवासाचा आनंद घेत होतो. समोरून नौदलाच्या स्पीड बोटीच्या फेऱ्या सुरू होत्या. हा थरार आम्ही रिल्ससाठी शुट करत होतो.
कुमारने सांगितले, अचानक ती बोट आमच्या बोटीला धडकली. अवघ्या तीन मिनिटात बोट कलंडली. सगळीकडे आरडाओरड सुरू झाली. ३० मिनिट एकमेकांचा हात पकडून समुद्रात तरंगत होतो.
दरम्यान, एका दांपत्याच्या कुशीत असलेले बाळ दुर्घटनेत बेपत्ता झाले. त्याच्या आईने हंबरडा फोडला. तेवढ्या नौदल मदतीसाठी आले आणि आम्ही वाचलो असे कुमारने सांगितले.